esakal | भाडेपट्ट्याने शेती घेऊनही हा शेतकरी कमवतोय लाखो
sakal

बोलून बातमी शोधा

Economic prosperity achieved by leasing agriculture

नगर शहराजवळील  नगर - औरंगाबाद रस्त्यानजीक बुऱ्हाणनगरच्या हद्दीत ६ वर्षांपूर्वी १० एकर आणि त्यानंतर पुन्हा १५ एकर अशी २५ एकर शेती भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. त्यात ते टोमॅटो, वांगी, कारले, दोडके, गवार, भेंडी, काकडी, पालक आदींचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतात. यातच १५ एकरवर चारा उत्पादन घेतले जाते.

भाडेपट्ट्याने शेती घेऊनही हा शेतकरी कमवतोय लाखो

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड हा शेवटचा तालुका आहे. तो दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. येथील गावांना नेहमीच दुष्काळ पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यातीलच हे धोंडपारगाव वेगळे नाही.

येथील संतोष मोहनराव पवार यांनी ॲग्री व इलेक्ट्रिकल पदविकेचे शिक्षण घेतले. वडिलोपार्जित ४० एकर शेती. मात्र अवर्षणाचे संकट कायमच. परंतु मनासारखी नोकरी मिळत नसल्याने विविध कंपन्यांत इलेक्ट्रिकलची कामे घ्यायला सुरुवात केली. त्यात चांगली प्रगती झाली. नगर, पुणे, औरंगाबाद येथे कामे सुरू असताना ते गावाकडून नगर शहरात राहायला आले.

पवार यांनी मधुबन ऑरगॅनिक हॉटेल उभारून सेंद्रिय शेती व बाजारपेठेला चालना दिली. तसेच ५० गीर गाईंचे संगोपन करून सुमारे १२५ लिटर देशी दुधासाठी ग्राहक पेठ तयार केली.

गोपालन व सेंद्रिय शेती

व्यवसाय चांगला सुरू होता. पण मातीची ओढ सतावणार नाही तो शेतकरी कुटुंबातील कसा? त्यांच्या धोंड पारगाव या मूळ गावात त्यांच्या वडिलांनी १२ एच एफ गाईंचे संगोपन करून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. यातूनच प्रेरणा घेऊन आणि काळाची गरज ओळखून त्यांनी देशी गीर गाईंचे संगोपन सुरू केले.

त्यासाठी त्यांनी गुजरात वरून ६ देशी गीर गाई आणल्या. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली. आजघडीला त्यांच्याकडे १८ मोठ्या तर लहान जनावरे मिळून ५० गाईंचे गोकूळ आहे. दिवसाला १०० ते १२५ लीटरपर्यंत दुधाचे संकलन होते.

तीन किलोमीटर परिसरात सुमारे ११० ग्राहकांना देशी दुधाची होम डिलिव्हरी देण्यात येते. या दुधाचा दर ७० रुपये प्रति लिटर आहे. देशी दुधाला दर्जा रहावा यासाठी सेंद्रीय चारा महत्त्वाचा आहे. सेंद्रिय चाऱ्यासाठी ते त्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या शेतीचा उपयोग करतात.

शेती घेतली भाडेतत्त्वावर

नगर शहराजवळील  नगर - औरंगाबाद रस्त्यानजीक बुऱ्हाणनगरच्या हद्दीत ६ वर्षांपूर्वी १० एकर आणि त्यानंतर पुन्हा १५ एकर अशी २५ एकर शेती भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. त्यात ते टोमॅटो, वांगी, कारले, दोडके, गवार, भेंडी, काकडी, पालक आदींचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतात. यातच १५ एकरवर चारा उत्पादन घेतले जाते. शेतीसाठी गोमूत्र व शेणखत याशिवाय कोणतेही खत वापरले जात नाही.

ऑरगॅनिक हॉटेल

सेंद्रिय शेती व त्याची बाजारपेठ यांना चालना देण्यासाठी त्यांनी नगर-औरंगाबाद रस्त्यावर पुन्हा भाडेतत्त्वावर जागा घेत अलीकडेच 'मधुबन ऑरगॅनिक हॉटेल' सुरू केले आहे. त्यांच्याच गोशाळेतील देशी गाईंचे दूध, तूप उपलब्ध केले आहे.

सध्या येथे उपलब्ध असलेले जेवण संपूर्णपणे सेंद्रिय नाही, तरीही ६०-७० टक्क्यांपर्यंत सेंद्रिय मालाचा वापर केला जातो. ग्राहकांचा या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद आहे. हॉटेल परिसरात ग्राहकांना बसण्यासाठी कमी खर्चात बांबूची घरे तयार केली आहेत.

पुढे येथे निसर्ग पर्यटन केंद्रही उभारायचे आहे. मागच्या रब्बीमध्ये त्यांनी २ एकरांवर केवळ शेणखत व गोमूत्र यांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने गव्हाचे पीक घेतले होते. येथे साधारण चाळीस लोकांना रोजगार मिळाला.

माती पाणी तपासणी केंद्र

 संतोष पवार यांनी नगर औद्योगिक वसाहतीत शासकीय परवान्यासह माती, पाणी, पान - देठ तपासणी केंद्र सुरू केले आहे. माफक व सरकारी दरात ही सेवा शेतकऱ्यांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. येथे ६ जण कार्यरत आहेत.

रोपवाटिका

हॉटेल शेजारीच त्यांची विविध प्रकारच्या फुलांच्या आणि शोभेच्या रोपांनी समृद्ध अशी रोपवाटिका आहे.यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे येथील कृषी महाविद्यालयातील प्रियांका सोपान घुले या विद्यार्थिनीने केलेल्या रिसर्चमधून पवार यांची सेंद्रीय शेतीची सक्सेस स्टोरी समोर आली आहे.

loading image
go to top