

Akole Gram Panchayat News
esakal
अकोले : अकोले तालुक्यातील एकदरेचे सरपंच योगेश ऊर्फ रामा भांगरे गेल्या दोन वर्षांपासून पसार असल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. पेसा व १५व्या वित्त आयोगाचा निधी खर्चाविना पडून आहे. तो परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी याबाबत गटविकास अधिकारी अमर माने यांच्याकडे लेखी तक्रार करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एकदरेची लोकसंख्या एक हजारांहून अधिक आहे. पाच सदस्यांच्या ग्रामपंचायतीत उपसरपंच लीला भांगरे, नानासाहेब भांगरे, अनिल पोटे व मंदा भांगरे हे चार सदस्य कार्यरत आहेत. मात्र, सरपंच अनुपस्थित असल्याने त्यांना आर्थिक अधिकार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावातील विकासकामांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ग्रामसेवक युवराज वायळ यांना पेसा अंतर्गत कामातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
त्यांच्याजागी महिनाभर उलटूनही पर्यायी ग्रामसेवकाची नियुक्ती झालेली नाही. परिणामी ग्रामस्थांना विविध शासकीय दाखले मिळण्यात अडचणी येत आहेत. घरकुल योजना, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, वैयक्तिक दाखले, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसाठी ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत. नोव्हेंबर २०२५ पासून सरपंच ग्रामपंचायतीत उपस्थित नसल्याने मासिक सभा व ग्रामसभा नियमित होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
१५व्या वित्त आयोगाचा सुमारे ८ लाख ४१ हजार रुपयांचा निधी खर्चाविना आहे. पेसा निधीही वापरला गेलेला नाही. त्यामुळे गावातील मूलभूत विकासकामे रखडली आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शिपाई बाळू भांगरे यांच्याशी सरपंच संपर्क साधत असल्याचे सांगण्यात येते, तसेच शासकीय योजना व सरपंच परिषदेच्या नावाखाली काही व्यक्तींकडून पैसे घेतल्याचे आरोपही ग्रामस्थांनी केले आहेत.
या आरोपांबाबत संबंधित व्यक्तींच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आश्रमशाळा व माध्यमिक विद्यालयाशी संबंधित समित्यांमध्ये सरपंच पदाची भूमिका असल्याने सरपंच अनुपस्थितीचा परिणाम या संस्थांच्या कामकाजावरही होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून जनतेचे हाल थांबवावेत, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी व आमदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सरपंचाविरोधात फसवणुकीचा गुन्हा लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, घरघंटी आदींच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून योगेश ऊर्फ रामा भांगरे यांच्याविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे शोध पथक त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणात सुमारे ७९ हजार ६०० रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद असून, यापूर्वी गावातील सुमारे ५० व्यक्तींची फसवणूक झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
"सरपंचाच्या अनुपस्थितीमुळे गावातील विकासकामे रखडली आहेत. त्यांच्या कृत्यामुळे गावाची बदनामी होत आहे. शासनाने तातडीने उपाययोजना करावी; अन्यथा न्यायासाठी पंचायत समितीसमोर आंदोलन करावे लागेल. -लीला भांगरे, उपसरपंच गावाचा विकास ठप्प झाला आहे. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी ग्रामसभा घेण्याचे ठरविण्यात आले आहे."
- काळू भांगरे
"एकदरे येथील सरपंच योगेश भांगरे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्याकडून अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत आणखी कुणाची तक्रार असल्यास त्यांनी राजूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा."
-किशोर पवार, पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.