तेच ठिकाण, कारणही तेच ः तब्बल पंधरा पुणेकर ट्रेकर्सवर मोबाईल मॅपमुळे ओढावला होता काळ

शांताराम काळे
Monday, 11 January 2021

समोरचे दृश्‍य पाहून धक्काच बसला. पुढे सगळीकडे पाणीच पाणी होते. पाण्यापर्यंत डांबरी रस्ता होता.

अकोले : मॅपमुळे रस्ता चुकल्याने पिंपळगाव खांड धरणात पुण्यातील तिघे गेले. मोबाईलमधील मॅपने घात केला. महिनाभरापूर्वी तब्बल पुणेकर ट्रेकर्सवर याच रस्त्यावर काळ चालून आला होता.

या बाबत खेड (राजगुरुनगर) येथील महेंद्र शिंदे म्हणाले, ""आजच्या "सकाळ'मध्ये पिंपळगावखांड धरणात मोटारीसह बुडून एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाचल्यावर आमच्यासोबत घडलेली घटना आठवली. 20 डिसेंबरची पहाट अजूनही स्मरणात आहे.

राजगुरूनगर (खेड) येथून आम्ही सौरंग्या ट्रेकिंग ग्रुपचे 15 जण कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रात्री दीड वाजता स्कूलबसने निघालो होतो. रस्ता माहिती नसल्याने गुगल मॅपच्या साहाय्याने चालक बस चालवत होता. पहाटे चारच्या सुमारास कोतुळमार्गे थोडे पुढे गेल्यानंतर बसचालकाने अचानक ब्रेक लावले.

काय झाले म्हणून विचारले असता, तो म्हणाला, की पुढे धुरकट दिसत आहे. रस्ताच दिसत नाही. रस्ता कुठंय? बसमधील आम्ही सर्व खाली उतरलो. समोरचे दृश्‍य पाहून धक्काच बसला. पुढे सगळीकडे पाणीच पाणी होते. पाण्यापर्यंत डांबरी रस्ता होता. पण पुढे अचानक पाण्यात रस्ताच गायब झाला होता.'' 
""बसच्या उजेडात काळेकुट्ट पाणी मध्येच चमकत होते.

हेही वाचा - शेवटचं मंगलाष्टक सुरू असताना कोसळला नवरदेव

गारठ्यामुळे पाण्यातून येणाऱ्या वाफा बसच्या उजेडात दिसत होत्या. बस पाण्यात जाता जाता वाचली होती. पाण्यापासून बस अवघ्या तीन-चार फुटांवर थांबली होती. पंधरा जणांना जलसमाधी मिळाली असती, पण चालकाच्या सतर्कतेमुळे नशिबाने वाचलो. सर्वांनी मनोमन देवाचे आभार मानले,'' असे शिंदे यांनी सांगितले.

जुना पूल - नवा पूल

रस्त्यावर धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी आहे. हा पूल किमान तीस फूट पाण्याखाली आहे. तेथे दोन पूल आहेत. नव्या पुलावरून वाहतूक होत असते. जेथे अपघात होतो तो पूल जुना आहे. रात्रीच्या वेळी वाहने पाण्यात जातात. काल झालेली घटनाही तशीच झाली.

बांधकाम विभागाने बोर्ड लावायची तसदीही घेतली नाही

त्या घटनास्थळाजवळ किमान बोर्ड लावण्याची गरज आहे. परंतु ते कामही त्यांना करता आलेले नाही. या घटनांबात सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त उपअभियंता ज्ञानेश्वर काकडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मी दोन महिने झाले निवृत्त झालो आहे. मी श्री. कडाळे यांच्याकडे चार्ज दिला आहे. कडाळे म्हणाले, जोपर्यंत नवीन अधिकारी येत नाही तोपर्यंत मी अॉफिसमधील काम सांभाळतो आहे. माझ्याकडे ईजीएसचा चार्च आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven Pune trekkers' bus sank in dam water