घोडेगावचा जनावरांचा बाजार सुरू झाल्याने चैतन्य परतले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

जनावरांच्या खरेदीसाठी खरेदीसाठी हैदराबाद, मुंबई, नांदेड, परभणी, कोल्हापूर येथील व्यापारी आले होते. गावात शेती औजारे, जनावरांना लागणारे साहित्य, तसेच भाजीपाला बाजार भरल्याने नेहमीचे चैतन्य परतल्याचे दिसत होते.

सोनई: कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेला घोडेगाव (ता. नेवासे) येथील जनावरांचा बाजार आज मोठ्या उत्साहात सुरू झाला. मात्र, पावसामुळे बाजारतळावर झालेल्या दलदलीमुळे शेतकऱ्यांना कसरत करीतच खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे लागले. 

कोरोनामुळे बाजार समितीने 20 मार्चपासून जनावरांचा बाजार बंद केला होता. राज्यात प्रसिद्ध असलेला बाजार बंद झाल्याने गाव व परिसराचे अर्थकारण थांबले. दरम्यान, लॉकडाउनमधून शिथीलता दिल्याने, आज बाजार भरला. सकाळी आठ वाजता बाजारात शेळी, मेंढी, बैल, गाय व म्हशींची आवक सुरू झाली. मात्र, पावसामुळे बाजारतळावर सर्वत्र चिखल, दलदल झाली होती. 

जनावरांच्या खरेदीसाठी खरेदीसाठी हैदराबाद, मुंबई, नांदेड, परभणी, कोल्हापूर येथील व्यापारी आले होते. गावात शेती औजारे, जनावरांना लागणारे साहित्य, तसेच भाजीपाला बाजार भरल्याने नेहमीचे चैतन्य परतल्याचे दिसत होते. मात्र, बाजारातील 90 टक्के लोकांच्या तोंडाला मास्क नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडाल्याचे चित्र होते. म्हैस बाजारात आज मोठी उलाढाल झाली. मात्र, बैलजोडीची आवक अवघी 58 होती.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enthusiasm as Ghodegaon cattle market started