रानटी प्राणी शेतातील पिकाचे नासधूस करत असल्याने शेतकरी मेटाकुटीस

शांताराम काळे 
Wednesday, 30 September 2020

रानटी प्राण्यापासून पिकाचा बचाव करण्याकरिता शेतकरी वेगवेगळे पर्याय करून थकले आहेत.

अकोले (नगर) : पावसामुळे पिकाचे झालेल्या नुकसानीतून सावरत असतानाच आता मोर-लांडोर, रानडुक्कर आणि वान्नर यासारख्या पक्षी व प्राणी यांच्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. रानटी प्राण्याचा प्रकोप वाढत चालला असून हातातोंडाशी आलेले उभे पीक एका रात्रीतून फस्त करत आहेत. संपूर्ण मशागत करून लेकराप्रमाणे पीक सांभाळले. हे प्राणी पिकाचे नासधूस करत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

रानटी प्राण्यापासून पिकाचा बचाव करण्याकरिता शेतकरी वेगवेगळे पर्याय करून थकले आहेत. बुजगावणे, कुत्र्यांचे भुंकणे, वाघाची डरकाळी, माणसाचे ओरडणे अशा आवाजाच्या किट लावून मोर-लांडोर, वानर व रानडुक्कर या प्राण्यांना रात्रीच्या वेळी हाकलून लावण्याकरिता पर्याय वापरले जात आहे. परंतु हे आवाज किंवा पर्यायी नित्याचे झाल्यास या ही पर्यायाला हे प्राणी जुमानत नाही. विशेषत: रानडुक्कराच्या संख्येत वाढ झाली असून ते सर्वात जास्त पिकाची नासाडी करत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

भात पिकात घुसून पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान करतात, म्हणून डुक्कर पिकांमध्ये शिरू नये, याकरता आता साडी व फेट्यांचा वापर करण्यात येत आहे. याबद्दल लवकरात लवकर वन विभागाने पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी भंडारदरा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी पडवळ डी.डी. म्हणाले, अभयारण्य असल्याने वन्यप्राणी, पक्षीचा वावर आहे. जंगलात हे मुक्त विहार करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. याबाबत नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवू.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer is exhausted as the animals are destroying the crop