खंडित वीजप्रश्नी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन; रास्ता रोको करण्याचा इशारा | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers agitation over power outage

Ahmednagar | खंडित वीजप्रश्नी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

बोधेगाव (जि. अहमदनगर) : बालमटाकळी (ता. शेवगाव) वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या अठरा गावांतील शेतीपंपांचा खंडित वीजपुरवठा सुरू करावा, वीजबिलात सवलत द्यावी, या मागण्यांसाठी बोधेगाव परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, रामनाथ राजापुरे, फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर बुधवारी (ता. २४) दोन तास ठिय्या आंदोलन केले.

रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

वीजपुरवठा पूर्ववत न केल्यास शेवगाव-गेवराई राज्यमार्ग अडविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बोधेगाव मंडळात सरासरी सात हजार ८०१ हेक्टरवर गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदींसह इतर रब्बी पिके घेतली जातात. सध्या विहिरी, कूपनलिकांना मुबलक पाणी असल्याने, शेतकऱ्यांनी खरिपाची झळ भरून काढण्यासाठी मोठ्या आशेने रब्बीची पिके घेतली. मात्र, ऐन मोसमात महावितरणने शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्याने पिकांसोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे खंडित वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अन्यथा बोधेगावसह बालमटाकळी परिसरातील शेतकरी पूर्वसूचना न देता एक डिसेंबर रोजी शेवगाव-गेवराई मार्गावर बोधेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन महावितरणचे सहायक अभियंता पंकज मेहता यांच्याकडे देण्यात आले.

हेही वाचा: शाळेला जाण्याची जीवघेणी धडपड... ST बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल

''संबंधित शेतकऱ्यांचे निवेदन मिळाले असून, त्या अनुषंगाने वरिष्ठांना कळविले आहे. शेतकऱ्यांनी किमान प्रतिजोड पाच हजार रुपये थकीत वीजबिल भरणे आवश्यक आहे. त्यानुसार वीजपुरवठा सुरळीत करता येईल.'' - पंकज मेहता, सहायक अभियंता, बालमटाकळी

बोधेगावचे सरपंच सुभाष पवळे, ग्रामपंचायत सदस्य रमजू पठाण, धोंडिराम घोरतळे, मयूर हुंडेकरी, बाळासाहेब देशमुख, रंगनाथ वैद्य, विक्रम बारवकर, हरिभाऊ केसभट, मनोहर घोरतळे, महादेव घोरतळे, संदीपान घोरतळे, हरिश्चंद्र घाडगे, नारायण काशीद, विक्रम गरड, लखू जगताप, पांडुरंग ढेसले, भागवत घोरतळे, प्रकाश गर्जे, मधुकर खोले उपस्थित होते.

हेही वाचा: अहमदनगर : शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स बोर्डने घेतला तरुणाचा बळी

loading image
go to top