हरभरा 'घाट्यात' अळी! बदलत्या हवामानाच्या शेतकरी चिंतेत

सुनील गर्जे  
Monday, 25 January 2021

यंदा परतीच्या पावसाने तसेच मुळा धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने विहीर, बोअरच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झाली आहे.

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यात सुरु असलेल्या रबी हंगामात ४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे; परंतु मागील काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे या पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने 'हातचे पीक जाते की काय' अशी चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
यंदा परतीच्या पावसाने तसेच मुळा धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने विहीर, बोअरच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची रब्बी पेरणी केलेली आहे. यापैकी ४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे.        

कर्जत-जामखेडच्या शेतकरी कृषी दिंडीने घेतले कांदा पिकाच्या तंत्रज्ञानाचे धडे   

पेरणीनंतर पिके जोमाने वाढली, त्यामुळे रब्बी हंगामातील उत्पन्नाच्या अशा वाढल्या होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून वातावरणात होत असलेले बदलामुळे हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादर्भाव जाणवत आहे. त्यामुळे हरभरा पीक हातून जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतीत झाले आहेत.

घाटेअळी नियंत्रणासाठी हे करा !

हरभरा पिकावर ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यांच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी आर्क, एकरी दोन कामगंध सापळे, वीस पक्षी थांबे बसवावेत. तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेंजोयेट पाच टक्के चार ग्रॅम किंवा क्चिनोल्फोस २० मि.लि. किंवा क्लोरनट्रालीप्रोल २.५ मि. लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वारणी करावी, असे आवाहन नेवासे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय डमाळे यांनी केले. 

हरभरा उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. ही घाटे अळी हरभरा पिकावर आपले दोन जीवनक्रम पूर्ण करत असल्याने नुकसान वाढते, त्यामुळे हरभऱ्याचे ३० ते ४० टक्के नुकसान होण्याची शक्यता असते.
- रावसाहेब घुले, तरवडी, ता. नेवासे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are being guided by the Taluka Agriculture Department to prevent the spread of larvae