
झावरे यांच्याकडे सध्या कोणतीही सत्ता नाही, तरीही त्यांनी संबंधितांकडे पाठपुरावा करून वासुंदे सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची तब्बल दीड कोटी रुपयांची कर्जप्रकरणे मंजूर करून घेण्यात यश मिळविले.
टाकळी ढोकेश्वर : कोरोनाचे संकट आणि त्यात अतिवृष्टीसारख्या दुष्टचक्राने हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे धावून आले.
जिल्हा बॅंकेमार्फत संकरित गाय संगोपन योजनेअंतर्गत वासुंदे सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची तब्बल दीड कोटी रुपयांची कर्जप्रकरणे मंजूर केली.
वासुंदे (ता. पारनेर) येथे गायी संगोपन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या रकमेचे धनादेश झावरे यांच्या हस्ते दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. नव्याने दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हा बॅंकेकडून कर्ज उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे साकडे वासुंदे येथील शेतकऱ्यांनी सुजित झावरे यांना घातले होते.
झावरे यांच्याकडे सध्या कोणतीही सत्ता नाही, तरीही त्यांनी संबंधितांकडे पाठपुरावा करून वासुंदे सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची तब्बल दीड कोटी रुपयांची कर्जप्रकरणे मंजूर करून घेण्यात यश मिळविले. धनादेश वाटपप्रसंगी बा. ठ. झावरे, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, अंबादास झावरे, किसन वाबळे, गंगाधर गायखे, धनंजय उदावंत, नारायण झावरे उपस्थित होते.
संपादन - अशोक निंबाळकर