शेतकर्‍यांनी ऊसाची अधिकाधीक लागवड करावी : बाबा ओहोळ

आनंद गायकावाड
Tuesday, 29 September 2020

दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांची आदर्श तत्व प्रणाली व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर साखर कारखान्याची दमदार व सातत्यपूर्ण विकासाची वाटचाल सुरु आहे.

संगमनेर (अहमदनगर) : दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांची आदर्श तत्व प्रणाली व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर साखर कारखान्याची दमदार व सातत्यपूर्ण विकासाची वाटचाल सुरु आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून शाश्वत उत्पन्नाची हमी देणाऱ्या ऊस या पीकाची जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लागवड करण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 2020- 21 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. माधवराव कानवडे होते. ते म्हणाले, संगमनेर कारखाना तालुक्याची कामधेनु आहे. यामुळे सहकाराबरोबर ग्रामीण विकास व आर्थिक चक्र तालुक्यात फिरत आहे. ही विकासाची संस्कृती आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका सर्व क्षेत्रात आघा़डीवर आहे. कोरोना संकटात कारखान्याने अद्यावत कोविड सेंटर सुरु केले. शेतकर्‍यांसाठी अनुदानाच्या अनेक योजना राबविल्या. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी. 

इंद्रजित थोरात यांनी वाडीवस्तीपर्यंत विकासाच्या योजनांचा पुरवठा केला. देवकौठेपर्यंत पाणी पोचविण्याचे काम केले. पावसाचे पाणी लाभक्षेत्रात पोचवण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून काम केले. यापुढे ही विकासाची वाटचाल चालू राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली. माजी अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे म्हणाले, कार्यक्षेत्रात उसाची जास्तीत जास्त लागवड झाली तर लवकरच कारखाना कर्जमुक्त होवून शेतकर्‍यांना अधिक भाव मिळेल. संगमनेर कारखाना सहकारात कायम लौकिक प्राप्त करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

ऊसावरील तांबेरा रोग निर्मूलनासाठी फवारणी तसेच डिस्टीलरी व गव्हाणीचे आधुनिकीकरण झाले असून येत्या गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले. यावेळी अनिल व लता काळे, शेखर व मंदा वाघ, दादासाहेब व सोनाली कुटे, विनोद व वैशाली हासे, डॉ. तुषार व सुरेखा दिघे या दांपत्यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले. 

याप्रसंगी बाजीराव खेमनर, इंद्रजित थोरात, शिवाजीराव थोरात, सुरेश थोरात, लक्ष्मण कुटे, शंकरराव खेमनर, मिरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, तहसीलदार अमोल निकम आदींसह संचालक मंडळ व मोठ्या संख्येने सभासद, ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers should cultivate more and more sugarcane