शेवगावात शेतकऱ्यांची कपाशीवर कुऱ्हाड, गहू, हरभऱ्याचा केला पेरा

राजू घुगरे
Thursday, 17 December 2020

यंदा जोरदार पाऊस झाल्याने कपाशीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीची बोंडे काळी पडली व सडली.

अमरापूर : अतिवृष्टीमुळे यंदा कपाशीचे पीक बऱ्याच प्रमाणात हातून गेले. त्यामुळे हंगाम पूर्ण होण्याची वाट न पाहता, शेतकऱ्यांनी कपाशी उपटून शेत मोकळे करण्यास सुरवात केली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांची पेरणी सुरू केली आहे.

यंदा पाणीसाठा मुबलक असल्याने बागायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, त्यामुळे कापूसउत्पादन घटणार आहे. 

तालुक्‍यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने कपाशीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीची बोंडे काळी पडली व सडली. अतिरिक्त पाण्यामुळे पिकाची वाढ खुंटली. त्याचा कापूसउत्पादनावर परिणाम झाला. कोरडवाहू क्षेत्रात तर एकरी अवघा एक ते तीन क्विंटल कापूस हाती आला. त्यातून झालेला खर्चही निघत नाही.

हेही वाचा - एकदाच करा लागवड खर्च, नंतर फक्त नोटा छापा

झाडाला कैऱ्या नसल्याने आता कापूसउत्पादनाची शक्‍यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी उपटून त्या जागी गहू, हरभरा, ज्वारी, ऊसलागवडीस सुरवात केली आहे. 

यंदा बंधारे, नद्या, ओढे, तलाव भरलेले असल्याने भूजल पातळी चांगली आहे. विहिरी, कूपनलिकांना चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे कपाशीचा हंगाम पूर्ण होण्याची वाट न पाहता, ती वेळेआधीच काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

हाती आलेला थोडाफार कापूस विकून रब्बीच्या पिकांची तयारी सुरू आहे. तालुक्‍यात 43 हजार हेक्‍टरपैकी जवळपास 50 टक्‍क्‍यांहून अधिक शेतकऱ्यांनी हे पीक काढून टाकले आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers uprooted cotton in Shevgaon