आधी कोरोनाची भीती, आता बिबट्याची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

नदीकाठच्या गावांमध्ये दहा वर्षांपूर्वी क्वचित दिसणारा बिबट्या आता तालुकाभर अस्तित्व दाखवू लागला आहे. घरापुढील कुत्री, शेळ्या गायब झाल्या, की बिबट्या येऊन गेल्याची जाणीव होत आहे.

आधी कोरोनाची भीती, आता बिबट्याची दहशत

श्रीगोंदे : तालुक्‍याच्या बहुतेक भागांत आता बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहे. शेतकऱ्यांच्या दारातील कुत्री, शेळ्यांना ते भक्ष्य बनवीत आहेत. बिबटे उसाच्या क्षेत्रात वस्ती करू लागल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात जाता येत नाही. यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वन विभाग मात्र याबाबत गंभीर नसून, शेतकऱ्यांचा जीव धोक्‍यात आला असूनही नियमांवर बोट ठेवण्यात अधिकारी धन्यता मानत आहेत. (Fear of leopard in Shrigonda taluka)

नदीकाठच्या गावांमध्ये दहा वर्षांपूर्वी क्वचित दिसणारा बिबट्या आता तालुकाभर अस्तित्व दाखवू लागला आहे. घरापुढील कुत्री, शेळ्या गायब झाल्या, की बिबट्या येऊन गेल्याची जाणीव होत आहे. भीमाकाठच्या पेडगावपासून सांगवी दुमालापर्यंत आणि घोड पट्ट्यातील काष्टी, वांगदरी, बोरी, राजापूर, माठ, वडगाव इथपासून तर रायगव्हाण भागापर्यंत बिबट्याने दहशत कायम ठेवली आहे.

हेही वाचा: गांधींची टिळकांसाठी सभा, महिलेने दिली हातातील सोन्याची पाटली

तालुक्‍यात साठपेक्षा जास्त बिबटे

तालुक्‍यात लहान-मोठे साठपेक्षा जास्त बिबटे असल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षांत सहा ते आठ बिबटे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. पिंजरे लावण्याची परवानगी नसल्याचे ते सांगत असले, तरी ग्रामपंचायतीने ठराव केल्यावर त्यांनी पिंजरे लावत हे बिबटे जेरबंद केले.

उसाच्या फडातील बिबट्यांचे वास्तव्य धोकादायक...

नदीकाठावरील गायरानांवर अतिक्रमण केल्याने बिबट्यांचे वास्तव्य धोक्‍यात आले. त्यामुळे त्यांचा मोर्चा गावाकडे वळला आहे. बिबटे बछड्यांना जन्म देत असून, सहजासहजी जागा सोडत नाहीत. त्यामुळे उसाची शेती करणे अडचणीचे ठरत आहे. शिवाय, ऊसतोडीसाठी येणाऱ्या कामगारांच्या महिला, लहान मुले यांचा धोका वाढला आहे. वन विभागासह साखर कारखान्यांनीही आता बिबट्यांच्या वाढत्या वास्तव्याचा विचार करून त्यावर निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

बिबट सफारी पूर्णत्वाची गरज

तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी बेलवंडी येथे बिबट सफारी पार्क मंजूर करून घेतला होता. त्याचे काम निधी मिळून सुरूही झाले; मात्र त्यांचे मंत्रिपद गेले आणि हा प्रकल्प दुसरीकडे वळविण्यात आला. हा प्रकल्प आता आवश्‍यक बनला असून, त्यासाठी नव्याने प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होत आहे.(Fear of leopard in Shrigonda taluka)

loading image
go to top