चांद्यात नेमका कोणाचा होणार वांदा, गडाख-मुरकुटे गटांत आहे लढत

विनायक दरंदले
Monday, 11 January 2021

सत्ताधारी गटाने विद्यमान सदस्यांपैकी दोन जणांना उमेदवारी देवून पंधरा नवीन चेहरे उभे केले आहेत. तर विरोधी गटप्रमुख वगळता सर्व सोळा उमेदवार नवे चेहरे आहेत.

सोनई (जि.अहमदनगर) ः चांदा ग्रामपंचायत निवडणुकीत आजी-माजी आमदार गटात.होत असलेली सरळ लढत चांगलीच रंगात आली आहे. चांद्यात कोण मारणार बाजी आणि कुणाचा होणार वांदा याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाचे नेतृत्व माजी पंचायत समितीचे सभापती कारभारी जावळे, 'मुळा'चे संचालक बाबुराव चौधरी, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे व अनिल अडसुरे करीत आहेत तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाचे नेतृत्व कैलास दहातोंडे करीत आहेत. सहा प्रभागातून सतरा उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

हेही वाचा - मोबाईल अॅपमुळे झाला घात, पुणे गेले वाहून

मराठा महासंघाच्या दहातोंडेची घरवापसी गडाख गटासाठी फायद्याची ठरणार असे चित्र आहे. मिरी रस्ता,
पुंडवाडी, साधक आश्रम परीसर, शिवाजी चौक, पेठ परीसर, शास्त्रीनगर, लोहारवाडी रस्ता आणि संपूर्ण गावात दोन्ही गटाने प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दोन्ही गटात गठ्ठा मतदान मिळविण्यासाठी स्पर्धा लागली आहे.

सत्ताधारी गटाने विद्यमान सदस्यांपैकी दोन जणांना उमेदवारी देवून पंधरा नवीन चेहरे उभे केले आहेत. तर विरोधी गटप्रमुख वगळता सर्व सोळा उमेदवार नवे चेहरे आहेत.

या गावात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेहमीच जातीय समीकरण लावत आणि ते जुळवत राजकारण केले जाते. चुरशीच्या या निवडणुकीत आजी का माजी आमदाराचा झेंडा लागणार या विषयी परीसरात उत्सुकता लागली आहे.

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting is in Gadakh-Murkute groups at Chanda