आमदार मोनिका राजळे यांच्यावर गुन्हा दाखल, भाजपच्या मदतीला धावली वंचित

राजेंद्र सावंत
Sunday, 30 August 2020

राजळे व भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य निमंत्रक प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

पाथर्डी  : दूधदरवाढीच्या मागणीसाठी एक ऑगस्ट रोजी भाजपतर्फे माळी बाभूळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महिनाभरानंतर आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध पाथर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. 

कोविड संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला होता. मात्र, तो डावलून राजळे यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उपाध्यक्ष गोकुळ दौंड, सरचिटणीस जनार्दन वांढेकर, प्रवीण राजगुरू यांच्यासह 30 ते 35 जणांनी आंदोलन केले. पोलिस कर्मचारी दीपक शेंडे यांच्या फिर्यादीवरून आज या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - शालिनीताई विखे पाटील यांच्या घराजवळ बिबट्याचा हल्ला

दरम्यान, राजळे व भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य निमंत्रक प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against MLA Monica Rajale