esakal | प्राध्यापक हल्ल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकासह चौघांविरुद्ध गुन्हा; एकजण ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

FIR against four persons including a security guard in connection with the professor at Agricultural University

महात्मा फुले कृषी विद्यापीठात एका प्राध्यापकावर रविवारी चौघांनी प्राणघातक हल्ला केला. फायटरने मारहाण करत, गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात विद्यापीठाचा सहायक सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ रघुनाथ शेटे व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राध्यापक हल्ल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकासह चौघांविरुद्ध गुन्हा; एकजण ताब्यात

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

राहुरी (अहमदनगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठात एका प्राध्यापकावर रविवारी चौघांनी प्राणघातक हल्ला केला. फायटरने मारहाण करत, गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात विद्यापीठाचा सहायक सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ रघुनाथ शेटे व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मुख्य संशयित आरोपी शेटे पसार आहे.

हेही वाचा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले भाजपमुळेच दूधउत्पादकांची परवड
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारातील अरविंद कॉलनीत सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल नवनाथ देसले (वय 48, रा. कळवाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांच्यावर रविवारी सायंकाळी साडेसात वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला. डॉ. देसले यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करीत प्रतिकार केल्यामुळे हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या, क्रमांक नसलेल्या कारमध्ये बसून पसार झाले. हल्ला करणाऱ्या चार जणांमध्ये विद्यापीठाचा सहायक सुरक्षारक्षक गोरक्षनाथ शेटे होता. डॉ. देसले यांनी त्याला ओळखल्याचे पोलिसांनी सांगितले. 

डॉ. देसले यांनी सोमवारी रात्री राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांचा मी वर्गमित्र व त्यांच्या गावचा असल्याचा समज, तसेच कुलसचिवांना शेटे यांच्याविषयी वाईटसाइट सांगितल्याने त्यांच्याकडील सहायक सुरक्षा अधिकारीपदाचा कार्यभार काढून घेण्यात आल्याचा शेटे याचा गैरसमज झाला असावा. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपी शेटे याने जिवे मारण्याचा कट रचला. शेटे याने अनोळखी तीन जणांसह काल रात्री फायटरने मारहाण केली. गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी शेटे याच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी शेटे पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

विद्यापीठ कार्यक्षेत्रात "काम बंद'चा इशारा
अत्यंत मनमिळाऊ व कोणाशीही शत्रुत्व नसलेल्या प्राध्यापकावर झालेल्या या हल्ल्यामुळे विद्यापीठाच्या अस्मितेवर, पर्यायाने सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सन्मानावर हल्ला झाल्याची भावना आज विद्यापीठ वर्तुळात उमटली. विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे प्रा. डॉ. उत्तम कदम यांनी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांना भेटून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, धुळे, कोल्हापूर येथील महाविद्यालयाच्या कार्यक्षेत्रातील संशोधन केंद्रांमधील कर्मचारी, प्राध्यापक व शास्त्रज्ञांनी आपापल्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये निषेध नोंदविला. या प्रकरणी तातडीने आरोपींचा छडा न लागल्यास विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये "काम बंद' आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
संपादन : अशोक मुरुमकर

loading image