esakal | पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; डोक्‍याला पिस्तूल लावून केला अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

A FIR against Inspector Vikas Wagh in Nagar district

एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अहमदनगरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला.

पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; डोक्‍याला पिस्तूल लावून केला अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अहमदनगरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला. पीडित महिला नगर शहरातील रहिवासी असून, गेले वर्षभर पिस्तुलाचा धाक दाखवून व मारहाण करून वाघ यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, की मार्च 2019मध्ये मी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले तेव्हा पोलिस निरीक्षक वाघ यांच्याशी ओळख झाली. तेव्हा त्यांनी माझा मोबाईल नंबर घेऊन मला वारंवार फोन करण्यास सुरवात केली. वाघ हे माझ्या वडिलांच्या वयाचे असल्याने त्यांच्या वागण्याचे मला वेगळे वाटले नाही. विशेष म्हणजे वाघ हेही मला मुलगी मानत होते. ते मला सतत फोन करू लागल्याने मी त्यांचे फोन टाळू लागले. त्यानंतर ते अचानक माझ्या घरी आले व घरी कोणी कर्ता पुरुष नाही हे पाहून त्यांनी माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांचा पाहुणचार केला. त्यावर त्यांनी लगट करण्यास सुरवात केली, तेव्हा मी त्यांना "तुम्ही माझ्या वडिलांचे वयाचे असून, मी तुमचा खूप आदर करते,' असे सांगितले. त्यावर त्यांनी, "मी या हद्दीचा अधिकारी आहे. तू मला खूप आवडते,' असे म्हणून त्यांच्या वर्दीला असलेल्या रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून माझ्यावर अत्याचार केला. मी प्रतिकार केला असता, त्यांनी मला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून, "कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या कुटुंबीयांना संपवून टाकीन,' अशी धमकी दिली.

त्यानंतर वाघ यांनी वारंवार माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून मला गर्भधारणा झाली. ही बाब मी 26 सप्टेंबर 2019 रोजी विकास वाघ यांना सांगितली. त्यावर त्यांनी मला त्यांच्या सरकारी निवासस्थानात बोलावून जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. त्यास नकार दिला असता, मला बेशुद्ध होईपर्यंत मारले.

शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी मला, "मी तुझ्याशी लवकरच लग्न करीन, तू आता फक्त गोळ्या घे,' असे सांगून माझा गर्भपात घडवून आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
माझ्या नऊ वर्षांच्या मुलाच्या जीवितास धोका असल्याने मी सर्व सहन केले; परंतु पुढे असह्य झाल्याने मी एप्रिल 2020मध्ये पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचे ठरविले. वाघ यांना ते समजले तेव्हा त्यांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी स्टॅम्प पेपरवर माझ्या सह्या घेतल्या. खंडणी व ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात गुंतविण्याची धमकी दिली.

माझा मोबाईल हिसकावून घेऊन त्यातील सर्व पुरावे नष्ट केले. तू माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तर मी आत्महत्या करून तुला गुन्ह्यात अडकवून टाकीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कोतवाली पोलिसांनी महिला पोलिस उपनिरीक्षक जयश्री काळे यांच्यासमक्ष पीडितेची तक्रार लिहून घेतली. त्यानंतर वाघ यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 376, 313, 323, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image