काष्टीत भीषण आगीने दुकानातील साहित्य खाक, लाखो रुपयांचे नुकसान

संजय आ. काटे
Friday, 25 September 2020

काष्टी येथील नगर- दौंड महामार्गालगत असणाऱ्या जायभाय कॉप्लेक्समधील तुलशी जनरल स्टोअरला शुक्रवारी (ता. २५) पहाटे आग लागली.

श्रीगोंदे (अहमदनगर) : काष्टी येथील नगर- दौंड महामार्गालगत असणाऱ्या जायभाय कॉप्लेक्समधील तुलशी जनरल स्टोअरला शुक्रवारी (ता. २५) पहाटे आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या दुकानाच्या शेजारी बँका, पेट्रोल पंप आहे. मात्र श्रीगोंदे पोलिसांच्या गस्त पथकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.

पोलिस उपनिरीक्षक सतिश गावित यांनी दिलेल्या माहितीनूसार गुरुवारची मध्यरात्र आणि शुक्रवारची पहाटेदरम्यान त्यांचे पथक घटनास्थळाजवळून चालले होते. त्याचवेळी दुकानातून धूर येताना दिसला. शेजारी पेट्रोलपंप, दोन बँका, एक पतसंस्था असताना हा धूर कसा निघतोय याचा अंदाज घेण्यासाठी ते थांबले. त्यावेळी एका दुकानाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच लगतच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना सावध केले. श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष आदेश नागवडे, उपसरपंच सुनील पाचपुते हेही घटनास्थळी दाखल झाले.

या सर्वांनी तातडीने नागवडे कारखाना व श्रीगोंदे नगर पालिकेच्या अग्निशमनविभागाशी संपर्क साधला. मात्र त्यादरम्यान एक तासांचा अवधी गेला. त्यामुळे दुकानातील दोन मजल्यावरील सगळे साहित्य जळाले. अग्निशमन बंब आल्यानंतर गावित व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांच्या मदतीने तातडीने आग विझवली मात्र तोपर्यंत दुकानातील सगळेच साहित्य जळून खाक झाले होते. तथापि गावित व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सतर्कतेने आसपास आग पसरली नाही व लोकही सावध होवून मदतीला धावले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire breaks out in a wooden shop in Shrigonda taluka