नगरमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस जिल्हा शल्य चिकित्सकांना

दौलत झावरे
Saturday, 16 January 2021

जिल्हा रुग्णालयात डॉ. पोखरणा व जिजामाता केंद्रात अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना प्रथम डोस देण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाला सुरवात झाली.

नगर : कोरोना लसीची प्रतीक्षा संपून, आता लसीकरणाला प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांसह अंगणवाडी सेविकेला प्रथम लस देऊन लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. 

कोरोना लसीकरण मोहिमेस आज (शनिवारी) जिल्ह्यात सुरवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा रुग्णालय व महापालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्रात त्याचा प्रारंभ केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयात डॉ. पोखरणा व जिजामाता केंद्रात अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना प्रथम डोस देण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाला सुरवात झाली.

हेही वाचा - दोन कावळ्यांचे भांडण, एक गतप्राण अन पुढे घडलेल्या प्रकाराने सर्वच हादरले

डॉ. भोसले म्हणाले, ""कोरोना संकटात आरोग्य यंत्रणेने बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण असून, पहिल्या टप्प्यात "फ्रंटलाइन वर्कर' म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 21 केंद्रे असून, त्यांपैकी जिल्हा रुग्णालयासह पाथर्डी व कर्जत उपजिल्हा रुग्णालये, तसेच शेवगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, अकोले ग्रामीण रुग्णालयांसह महापालिका क्षेत्रातील तोफखाना, जिजामाता, केडगाव व नागापूर या नागरी आरोग्य केंद्रांवर ही मोहीम सुरू झाली. 

महापालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्रात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह आमदार संग्राम जगताप, स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, महापालिकेचे पदाधिकारी, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली. अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना लसीकरणाचा पहिला मान मिळाला. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first dose of corona vaccine in Ahmednagar to district surgeons