कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराच्या घशात गेल्या होत्या, त्यातूनच...

The first sugar factory in Maharashtra was started at Loni Budruk
The first sugar factory in Maharashtra was started at Loni Budruk

अहमदनगर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. राजकीय क्षेत्रातही या जिल्ह्याचे वेगळं स्थान आहे. भौगोलिक स्थानामुळेही हा जिल्हा प्रसिद्ध आहे. कारण एका बाजूला असलेल्या डोंगर रांगामुळे कोकणात असल्याचा भास होतो तर दुसऱ्या बाजूला वाळवंटात असल्याप्रमाणे दुष्काळाशी सामाना करावा लागतो. या जिल्ह्याला एैतिहासिक महत्त्व आहे.

अनेक घडोमोठी या जिल्ह्यात झालेल्या आहेत. या जिल्ह्यात एका अकोले भागात भात शेती मोठ्या प्रमाणात होते. याचबरोबर ऊस सुद्धा मोठ्याप्रमाणात घेतला जातो. शाश्‍वत पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. मात्र, ऊस गाळपासाठी साखर कारखान्याची आवश्‍यकता असते. असाच उसाचे गाळप करणारा पहिला सहकारी साखर कारखाना या जिल्ह्यात झाला. पण हा कारखाना कसा निर्माण झाला यालाही इतिहास आहे. विठ्ठलराव एकनाथराव विखे- पाटील हे पहिल्या कारखान्याचे प्रवर्तक!

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक (ता. श्रीरामपूर) या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म झाला. लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी लहान वयातच शेती करण्यास सुरुवात केली. तेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते. हे नेमके हेरून त्यांनी व्हवहारबुद्धी, चातुर्य व काटकसरीने शेती केली. 
त्यांनी ‘लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी’ची स्थापना करून सार्वजनिक जीवनातील

सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले. गावातील पाथरवट- वडार मंडळींना एकत्र आणून ‘मजूर सहकारी सोसायटी’चीही त्यांनी स्थापना केली. इंग्रज सरकारने मुंबई कौन्सिलमध्ये ‘तुकडे बंदी आणि तुकडे जोड’ हे विधेयक आणले. या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे सावकाऱ्यांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते. अशा वेळी इस्लामपूर येथे शाहू महाराजांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखे− पाटील नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह गेले. 

पुढे महाराष्ट्राच्या एक लाख शेतकऱ्यांनी याच प्रश्नासाठी पुण्याच्या कौन्सिल हॉलला वेढा घातला, त्यात विखे− पाटील आघाडीवर होते. त्यात विखे− पाटील आघाडीवर होते. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेची जाणीव करून देऊन, संघटित होण्याचे व त्यातून व्यक्तिगत व सामुदायिक विकास साधण्याचे महत्त्व पटवून दिले.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड (श्रीरामपूर) येथे १९४५ मध्ये पार पडलेल्या ‘द डेक्कन कॅनॉल्स बागायतदार परिषदेत विखे-पाटील’ यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला.

त्यानंतर शेतकऱ्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणूक विखे- पाटील यांच्यावरच जबाबदारी टाकली. त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी १९४५ ते १९५० या कालखंडात अतोनात कष्ट घेऊन, गावोगावी व दारोदारी भटकंती करून भागभांडवल जमविले, तसेच कारखान्याला शासनाकडून मंजूरी मिळविली. कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या भटकंतीकरिता शेतकऱ्यांचा एकही पैसा खर्च केला नाही. ‘परान्न घेणार नाही’ अशी त्यांची प्रतिज्ञा होती, त्यामुळे आपली भाकरी ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशात बाळगीत असत. विखे−पाटील यांची साखर कारखाना काढण्याची कल्पना त्यावेळी हास्यास्पद ठरविली गेली.

अशा सर्वस्वी प्रतिकूल परिस्थीतीला तोंड देत विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी कारखान्या’ची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली आणि या कारखान्यातून साखर उत्पादन सुरू झाले. त्यावेळचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले. प्रवरानगराचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो.

शेतकऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांची योजना विखे−पाटील यांनी यशस्वी रीत्या राबविल्यामुळे भारत सरकारने त्याचा लाभ आणि माहिती भारतातील विविध प्रतिनिधी आणि अभ्यासू शेतकरी यांना व्हावी, म्हणून अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्यांची पहिली परिषद १९५६ मध्ये प्रवरानगर येथे भरविली. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः प्रवरानगरला येऊन विखे-पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com