esakal | पुरात वाहून गेली जनावरे! पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना हूरहूर
sakal

बोलून बातमी शोधा

Bodhegaon Flood

पुरात वाहून गेली जनावरे! पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना हूरहूर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

बोधेगाव (जि. नगर) : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात बोधेगाव परिसराला शनिवारी (ता.४) रात्री पून्हा एकदा अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. कांबी येथील गावनदीला पूर आल्याने नदीकाठच्या वस्त्यांसह गावाला पाण्याने वेढा दिला आहे. येथील राहती घरे, मंदिरे, ग्रामपंचायत कार्यालय, जनावरांचे गोठे, दुकाने यांमध्ये पाणी शिरल्यामूळे नुकसान झाले आहे. तसेच बोधेगाव येथील काळा ओढ्यावरचा पूल पाण्याखाली गेल्याने शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील वाहतूक बारा तासांहून अधिक वेळ पूर्णपणे ठप्प होती.


पोळा सणाच्या पूर्वसंध्येला बोधेगावसह बालमटाकळी, गायकवाड जळगाव, हातगाव, कांबी, मुंगी, लाडजळगाव, गोळेगाव, आधोडी, आंतरवाली, शोभानगर परिसरात शनिवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने रविवारी (ता. ५) पहाटे काशी नदीसह परिसरातील छोट्या-मोठ्या ओढ्यानाल्यांना पूर आला. कांबी येथील सुमीत पांचारिया यांची दोन जनावरे गावनदीला आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेली. तर कृषी सेवा केंद्रात पाणी शिरल्याने खते, बी-बियाणे आदींचे नुकसान झाले. गावालगतच्या कर्डिले, गाडे, म्हस्के आदी लोकवस्त्यांना पाण्याने वेढल्यामूळे तेथील ३० ते ४० कुटूंबे अडकून पडली आहेत. गावाशी त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तसेच परिसरातील कपाशी, तूर, सोयाबीन, कांदा, बाजरी, ऊस आदी पिकांचे शेतात पाणी साचल्यामूळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर रस्ते, पूल पाण्यामुळे उखडल्याने रहदारी ठप्प झाली आहे. बोधेगाव मंडळात या पावसाची ६८ मिमी नोंद झाली आहे.

हेही वाचा: अकोले : कोंभाळणेत रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा

कांबी, लाडजळगाव, हातगाव आदी ठिकाणी पावसामुळे राहती घरे, दुकानांत पाणी शिरले आहे. तर तीन जनावरे वाहून गेल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक आदींना नुकसानींची पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत सांगितले आहे.
- अर्चना पागिरे, तहसीलदार, शेवगाव.

गावनदीला पूर आल्याने पहाटेच्या सुमारास पाण्याने गावाला वेढा दिला. शेती पिकांसह दुकाने, घरे आदींचे नुकसान झाले आहे. काही जनावरे वाहून गेली. प्रशासनाने नुकसानींचे तातडीने पंचनामे करून पुरग्रस्तांना मदत मिळवून द्यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- नितेश पारनेरे, सरपंच कांबी (ता.शेवगाव)

हेही वाचा: नाशिक : कांद्यांची आवक घटूनही बाजार भाव घसरलेलेच

loading image
go to top