कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात यंदा वणवा पेटलाच नाही

शांताराम काळे 
Thursday, 31 December 2020

कळसूबाई, हरिश्‍चंद्रगडाचा परिसर नेहमीच निसर्गप्रेमी व पर्यटकांना आकर्षित करतो. वर्षभर येथे पर्यटक येत असतात. ट्रेकर्ससाठी हे आवडीचे ठिकाण आहे.

अकोले (अहमदनगर) : तालुक्‍यातील कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात यंदा वणवे लागण्याचे प्रमाण कमी झाले. कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने पर्यटकांना बंदी घालण्यात आली. तसेच लोकसहभागामुळे कृत्रिम वणव्याचा भडका उडाला नाही, अशी माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

कळसूबाई, हरिश्‍चंद्रगडाचा परिसर नेहमीच निसर्गप्रेमी व पर्यटकांना आकर्षित करतो. वर्षभर येथे पर्यटक येत असतात. ट्रेकर्ससाठी हे आवडीचे ठिकाण आहे. वन्यजीवांचे हे माहेरघर आहे. मात्र, देशासह राज्यावर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे गेली 9 महिने या भागात पर्यटक फिरकले नाही. त्यात निसर्गाचे जतन करणारे थोडे व आनंद द्विगुणित करताना निसर्गाला हानी पोचविणारे अधिक, मात्र लॉकडाऊनमुळे ही मंडळी या भागात फिरकली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळ, अमोल आडे यांनी गावागावात जावून वणवे लागल्यास वन विभागाला कळविण्याचे आवाहन केले. कृत्रिम वणवे पसरविणे कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी गंभीर शिक्षा होऊ शकते, हे समजावून सांगितले. ठिकठिकाणी फलक लावून प्रबोधन केले. त्याला लोकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

गतवर्षी साडेतीन एकरांवर वणवे लागले. त्यातून जंगलाचे मोठे नुकसान झाले. वन विभागाने ज्या गावांत वणवे लागणार नाहीत, अशा गावांना पाच हजार रुपयांचे बक्षिस ठेवले. त्यात घाटघर, रतनवाडी, पांजरे, कुमशेत, लव्हाळवाडी, साम्रद, उडदावणे आदी गावांनी सहभाग नोंदविला. वन विभागाने फायरलाईन ओढून वणवा लागला, तरी अधिक आग लागणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळे यावर्षी वणवे लागले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest fire cases reduce in kalsubai harishachandrgadh