नगरसेवकाचेच केले अपहरण...शिर्डीच्या माजी उपनगराध्यक्षांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

न्यायालयाने गृह विभाग व लोणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. कागदपत्रे हजर करण्याचे आदेश दिले.

नगर ः शिर्डी नगरपंचायतीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक दत्ता कोते यांचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात लोणी पोलिसांनी शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष विजय कोते यांना आज अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

या बाबत मिळालेली माहिती अशी ः मनसेचे नगरसेवक दत्ता कोते यांचे 24 जून 2019 रोजी रात्री बाभळेश्‍वर परिसरात नगर-कोपरगाव राज्यमार्गावरून अपहरण करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्‍वभूमीवर हे अपहरण करण्यात आले होते. याबाबत लोणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. नंतर या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले नाही. दरम्यान, गेल्या 26 जून रोजी माजी उपनगराध्यक्ष विजय कोते यांनी शिर्डीतील एका हॉटेलात सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांची बैठक बोलाविली.

हेही वाचा - सारा अनर्थ एका लग्नाने केला

या बैठकीत त्यांनी "राजकीय सुडातून आपण हे अपहरण केले; मला माफ करावे,' अशी विनंती केली. तसेच, मनसेचे नगरसेवक कोते यांच्या कुटुंबीयांना पैशांचे आमिष दाखविले, धमकीदेखील दिली, अशा आशयाची तक्रार लोणी पोलिस ठाण्यात दत्ता कोते यांनी दाखल केली. 

पोलिसांनी कारवाई न केल्याने दत्ता कोते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आणि या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. न्यायालयाने गृह विभाग व लोणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. कागदपत्रे हजर करण्याचे आदेश दिले.

या सर्व घडामोडींनंतर विजय कोते यांच्या विरोधात लोणी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former deputy mayor of Shirdi arrested