
जिल्हातील पत्रकारितेत कै. खांबेकर यांचे मोठे योगदान होते. साई संस्थानच्या माध्यमातून त्यांचा देश विदेशातील भाविकांशी दांडगा जनसंपर्क होता.
कोपरगाव : श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त, जेष्ठ पत्रकार अशोक भीमाशंकर खांबेकर (65) यांचे नाशिक येथे निधन झाले. साईबाबा संस्थांनचे ते वीस वर्षे तर कानिफनाथ देवस्थान ( मढी) व कोपरगाव येथील भवानी मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त होते. खांबेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
कॉंग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचे व कॉंग्रेस पक्षाचे ते खंदे समर्थक होते. नवशक्ती, तरुण भारत, नवा काळ ,देवगिरी तरुण भारत, प्रभात अशा दैनिक वृत्तपत्रासह पीटीआयचे पत्रकार म्हणूनदेखील त्यांनी अनेक वर्षे सेवा दिली.
जिल्हातील पत्रकारितेत कै. खांबेकर यांचे मोठे योगदान होते. साई संस्थानच्या माध्यमातून त्यांचा देश विदेशातील भाविकांशी दांडगा जनसंपर्क होता. त्यांनी आपल्या पत्नीला नगरसेविका, उपनगराध्यक्ष ते प्रभारी नगराध्यक्ष बनवण्यात मदत केली. स्व. खांबेकर यांना प्रशासकीय सेवेतील अधिकारी, पदाधिकारी व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल, त्यांचे कौटुंबिक इतिहास तोंडपाठ असायचा. त्यामुळे चालते बोलते संगणक म्हणून ते ओळखले जात.
हेही वाचा - मंत्री गडाख यांच्यामुळे हटली शनि देवस्थानची साडेसाती
गेल्या तीन आठवड्यपासून ते कोरोना संसर्गाने आजारी होते. मात्र, नाशिक येथे खाजगी रुग्णालयांत उपचार सुरु असताना आज दुपारी अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आमदार अशुतोष काळे, संजीवनीचे बिपीन कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शिवसेनेचे नितीन औताडे यांनी शोक व्यक्त केला.