काळरात्र! पाथर्डीत आरामबस- कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू

राजेंद्र सावंत
Tuesday, 29 December 2020

करंजी शिवारातील हॉटेलसमोर रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरामबसची कारला धडक बसून, कारमधील चौघांचा मृत्यू झाला.

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्‍यातील करंजी शिवारातील हॉटेलसमोर रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरामबसची कारला धडक बसून, कारमधील चौघांचा मृत्यू झाला. 

परमेश्वर लक्ष्मण काळे (रा. धामणगाव, ता. शेलू, जि. परभणी), केशव विठ्ठल बोराडे (रा. अंबोडा, ता. मंठा, जि. जालना), राजेभाऊ शंकर कदम (रा. राजेगाव, ता. परळी, जि. बीड) व विनोद महादेव धावणे (रा. कोथरूढ, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत पाथर्डी पोलिसांनी बसचालक सिद्धार्थ देवराम कांबळे (रा. शेबाळपिंप्री, ता. पुसद, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

पाथर्डीकडून वरील चौघे कारमधून रविवारी रात्री पुण्याकडे जात होते. करंजीजवळ हॉटेल सुभद्रासमोर मध्यरात्री दोनच्या सुमारास नगरहून भरधाव वेगात आलेल्या आरामबसची त्यांच्या कारला जोरात धडक बसली. त्यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. बसच्या धडकेमुळे कारचा चक्काचूर झाला. रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्तांना मदत पोचण्यास उशीर झाला. परिसरातील प्रमोद क्षेत्रे, रमेश क्षेत्रे, अनिल पालवे यांच्यासह ग्रामस्थ अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तिसगाव येथून रुग्णवाहिका बोलावून त्यास पाथर्डीतील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. याबाबत माहिती मिळताच, सहायक पोलिस निरीक्षक परमेश्वर जावळे, हवालदार अरविंद चव्हाण, महामार्गाचे पोलिस नाईक संजय आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू केले. 

राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण 
कल्याण-विशाखापट्टणम्‌ राष्ट्रीय महामार्गाचे फुंदे टाकळी ते चांदबिबी महालपर्यंत काम अपूर्ण आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने अपघात होतात. त्यात बळी जाणारांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना अपंगत्व आले. अशा अपघातप्रकरणी जबाबदार अधिकारी, ठेकेदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आग्रह मृतांच्या नातेवाईकांनी अनेकदा पोलिसांकडे धरला होता. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four killed in Arambus car accident in Pathardi