esakal | जिल्हा बॅंकेच्या सोनेपडताळणीला वेगळे वळण; तारण दागिने बदलले, कर्जदाराचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud in gold mortgage at Songaon branch of Nagar District Bank

नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या सोनगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर करून, बनावट दागिने टाकले. तत्कालीन शाखाधिकारी व सुवर्णपारखी यांनी संगनमताने तारण खऱ्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला.

जिल्हा बॅंकेच्या सोनेपडताळणीला वेगळे वळण; तारण दागिने बदलले, कर्जदाराचा आरोप

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : "नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या सोनगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर करून, बनावट दागिने टाकले. तत्कालीन शाखाधिकारी व सुवर्णपारखी यांनी संगनमताने तारण खऱ्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. त्यांना वकिलांतर्फे नोटीस बजावली आहे. याबाबत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत,' असा खुलासा सोनेतारण कर्जदार बिपीन ताठे यांनी "सकाळ'शी बोलताना केला. यामुळे बॅंकेच्या सोनेपडताळणी प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा बॅंकेने नुकतेच सोनगाव शाखेतील सोनेतारण केलेल्या 191 कर्जदारांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी केली. त्यात तब्बल 134 कर्जदारांचे सोने बनावट आढळून आले होते. बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित कर्जदार व सुवर्णपारखी यांच्याविरुद्ध बॅंकेतर्फे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात एका कर्जदाराने बॅंकेच्या तत्कालीन शाखाधिकाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने, बॅंक वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

याबाबत कर्जदार ताठे म्हणाले, ""माझ्या एकत्र कुटुंबातील सोन्याचे दागिने 2 जानेवारी 2019 रोजी सोनगाव शाखेत तारण ठेवून एक लाख 95 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या वेळी बॅंकेच्या अधिकृत सुवर्णपारखींनी दागिन्यांची पडताळणी करून मूल्यांकन केले. त्यानुसार तत्कालीन शाखाधिकाऱ्यांनी बॅंक नियमाप्रमाणे कर्ज दिले. त्यानंतर वेळोवेळी बॅंकेच्या कर्जाचे हप्ते भरले; मात्र कोविड संकटात कर्जहप्ते भरता आले नाहीत. बॅंकेने हप्ते भरण्याबाबत नोटीस पाठविली.'' 

हेही वाचा : सरकार फेरआढावा घेत नसल्याने जनहिताच्या योजना कागदावरच : अण्णा हजारे
कुवतीनुसार हप्त्याची रक्कम भरली. बॅंकेतर्फे सोनेपडताळणीसाठी वकिलाची नोटीस मिळाली. 31 ऑक्‍टोबर रोजी राहुरी येथे बॅंकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयात सोनेपडताळणीसाठी उपस्थित राहिलो. त्या वेळी पंचांसमक्ष सोन्याची पिशवी उघडताना सोन्याच्या बांगड्या व गंठण बदलल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्याच वेळी मी आक्षेप घेतला; परंतु बॅंकेच्या सोनेपडताळणी प्रक्रियेत बाधा येऊ दिली नाही. माझ्या दागिन्यांची अफरातफर करून अपहार करण्यात आला आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे,'' असेही ताठे यांनी सांगितले. 


कर्जदार बिपीन ताठे यांच्यासमक्ष सोनेपडताळणी झाली. त्यात त्यांनी तारण ठेवलेले सोन्याचे काही दागिने बनावट आढळले. तसा पंचनामा करून त्यांची सही घेतली आहे. दागिने बदलल्याबाबत त्यांची तक्रार बॅंकेला मिळाली आहे. वरिष्ठ कार्यालयातर्फे याची रीतसर चौकशी होईल. 
- प्रवीणकुमार पवार, शाखाधिकारी, जिल्हा सहकारी बॅंक, सोनगाव 

संपादन : अशोक मुरुमकर