सरणासाठी मोफत मिळणार सरपण, शिर्डीत का घेतला असा निर्णय

सतीश वैजापूरकर
Friday, 15 January 2021

अंत्यविधीसाठी मोफत सरपण देण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

शिर्डी ः आप मेला जग बुडाले अशा आशयाची एक म्हण आहे. परंतु हिंदू धर्मातच नव्हे तर कोणत्याही धर्मात अंत्यविधीला फार महत्त्व आहे. मृत्यूनंतरही विधी करावेच लागतात. अंत्यविधीसाठीचा खर्चही काही कुटुंबांना परवडत नाही. शिर्डीसारख्या धार्मिक स्थळी तर अनेक बेवारस मृतदेह आढळतात. त्यांच्यावर अंत्यसंस्कारावेळी सामाजिक कार्यकर्त्यांना वर्गणीच करावी लागते. त्यामुळे शिर्डी नगर पंचायतीने हा निर्णय घेतलाय.

अंत्यविधीसाठी मोफत सरपण देण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गरजू कुटुंबांना यामुळे दिलासा मिळेल, अशी माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली. 

हेही वाचा - भाजपचे चाणक्य गेले रोहित पवारांच्या भेटीला

ते म्हणाले, ""आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून हा विषय बैठकीत मांडला. उपनगराध्यक्ष सचिन कोते यांच्यासह समितीचे अन्य सदस्य बैठकीस उपस्थित होते. नगरपंचायतीकडील नोंदीनुसार दरमहा सुमारे 20-25 अंत्यविधी होतात. एका अंत्यविधीसाठी साधारणतः 1200 रुपयांचे सरपण लागते. दरमहा 30 हजार रुपये खर्च गृहीत धरून आर्थिक तरतूद केली आहे. 

शिर्डीत बेवारस मृत्यूच्या अनेक घटना घडतात. अनेक कुटुंबांना अंत्यसंस्काराचा खर्च झेपत नाही. अशा वेळी सेवाभावी कार्यकर्ते पुढाकार घेऊन मदत गोळा करतात. नगरपंचायतीच्या या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. ही सुविधा शहरातील सर्वांसाठी असेल, असे गोंदकर यांनी सांगितले. 
नगराध्यक्ष गोंदकर यांनी मातुःश्रीच्या स्मरणार्थ मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी वैकुंठरथ तयार केला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून ही सेवा विनामोबदला दिली जाते. आता त्यांच्याच नगराध्यक्षपदाच्या काळात अंत्यविधीसाठी मोफत सरपण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free firewood for funerals in Shirdi