जागतिक एड्‌स दिन विशेष : रुग्णालयातील केंद्रात एचआयव्हीची मोफत तपासणी; एका गरोदर मातेला बाधा 

गौरव साळुंके
Tuesday, 1 December 2020

राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक राज्यात राज्य एड्‌स नियंत्रण संस्थांची निर्मिती केली आहे. त्यामार्फत जिल्हा एड्‌स नियंत्रण विभाग स्थापन केला आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक राज्यात राज्य एड्‌स नियंत्रण संस्थांची निर्मिती केली आहे. त्यामार्फत जिल्हा एड्‌स नियंत्रण विभाग स्थापन केला आहे. त्यातून विभागांतर्गत प्रत्येक जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात मोफत एचआयव्ही तपासणीसाठी एकात्मिक सल्ला आणि चाचणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. 

एप्रिल- 2019 ते मार्च- 2020मध्ये 9046 जणांची मोफत एचआयव्ही तपासणी केली. त्यात 36 लोक बाधित आढळले. त्यांना एआरटी औषधोपचार सुरू करण्यात आले. तसेच 5937 गरोदर मातांची तपासणी केली असता, एक माता बाधित आढळली. तिच्यावर एआरटी औषधोपचार सुरू करून बाळाला संसर्ग होऊ नये, यासाठी उपचार सुरू केले. 

राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत येथील ग्रामीण रुग्णालयात 2007पासून मोफत एचआयव्ही तपासणी आणि औषधोपचारासाठी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राची स्थापना केली आहे. या विभागात रोज समुपदेशन केल्यानंतर मोफत एचआयव्ही तपासणी करून बाधित आढळल्यास मोफत औषधोपचार मिळतो. 

एचआयव्ही बाधितास संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यासाठी दुर्धर आजार प्रमाणपत्र देऊन योजनेचा लाभ मिळवतो. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर एडस जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जिल्हा एड्‌स नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय येथील जिल्हा कार्यक्रमप्रमुख वाजी जाधव यांच्या मार्गदर्शनखाली मोफत एचआयव्ही तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. येथील ग्रामीण रुगणालयात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रात ईआयडी कार्यक्रम राबविला जातो. 

कार्यक्रमात एचआयव्ही बाधित गरोदर मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला संसर्ग होऊ नये, म्हणून उपाययोजना केल्या जातात. ग्रामीण रुगणालयाच्या एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रात आजपर्यंत 30 बालकांना एचआयव्ही संसर्गापासून रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. 

महाविद्यालयांचे सहकार्य 
रयत शिक्षण संस्थेचे डाकले जैन महाविद्यालय, बोरावके महाविद्यालय, अशोकनगर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बेलापूर येथील जेटीएस महाविद्यालय आणि सेवा नर्सिंग कॉलेज, संतलूक नर्सिंग महाविद्यालय व स्नेहालय संस्था एड्‌स जनजागृतीसाठी ग्रामीण रुग्णालयाला सहकार्य करतात. एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रात प्रसन्न धुमाळ समुपदेशन करतात. प्रयोगशाळा तज्ज्ञ लक्ष्मीकांत करपे तपासणीसाठी मदत करतात. अधिपरीचारक राकेश गायकवाड मोफत एआरटी औषधोपचारासाठी मदत करतात. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free HIV testing will be done at the hospital center