नगर पोलिसांनी रस्तालूट करणारी दरोडेखोरांची टोळी पकडली

सूर्यकांत वरकड
Tuesday, 12 January 2021

निंबळक ते केडगाव बाह्यवळण रस्त्यावर 8 जानेवारी रोजी रात्री रेल्वे पुलाजवळ काही जणांनी दोन ट्रकचालकांना अडवून लुटले होते.

नगर : पादचारी, ट्रकचालकांना रात्रीच्या वेळी रस्त्यात अडवून मारहाण करीत लूट केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस पथकाने पाच जणांची टोळी जेरबंद केली. 

अक्षय भीमा गाडे (वय 23, रा. मुदगल वाडा, शिवाजीनगर), विश्‍वास नामदेव गायकवाड (वय 21, रा. एमआयडीसी), नीलेश बाळासाहेब कार्ले (वय 22, रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता), नीलेश संजय शिंदे (वय 21, रा. तांबटकर मळा) व अमोल बाबूराव कणसे (वय 25, रा. बोल्हेगाव, नगर) अशी त्यांची नावे आहेत. 

निंबळक ते केडगाव बाह्यवळण रस्त्यावर 8 जानेवारी रोजी रात्री रेल्वे पुलाजवळ काही जणांनी दोन ट्रकचालकांना अडवून लुटले होते. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना हा गुन्हा पाच-सहा जणांच्या टोळीने केल्याचे समजले. गुप्त माहितीवरून पोलिसांनी वरील आरोपींना विविध ठिकाणांवरून अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 

हेही वाचा - नवरदेव कोसळला शेवटच्या मंगलाष्टकापूर्वी

पाइपलाइन रस्त्यावरील प्रियदर्शनी हॉटेलसमोर पादचाऱ्याला 800 रुपयांना लुटल्याची कबुलीही त्यांनी दिली. पोलिसांनी आरोपींकडून मोटारीसह तीन लाखांचा ऐवज हस्तगत केला. त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे.

पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलिस कर्मचारी अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, धीरज अभंग, दत्तात्रेय कोतकर, सचिन जगताप, धीरज खंडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A gang of robbers was caught