
घर ज्वाळांनी वेढले गेले. आतील वस्तू जळून खाक झाल्या. मात्र, नगरपंचायतीच्या अग्निशामक विभागाने तत्परतेने आगीवर नियंत्रण आणले.
शिर्डी (अहमदनगर) : काळ आला होता; परंतु वेळ आली नव्हती,' या म्हणीचा प्रत्यय बुधवारी शहरातील श्रीरामनगर परिसरात आला. घरांची दाटी असलेल्या भागात एका खोलीत ठेवलेल्या पाच गॅस सिलिंडरपैकी एकाचा स्फोट झाला. घर ज्वाळांनी वेढले गेले. आतील वस्तू जळून खाक झाल्या. मात्र, नगरपंचायतीच्या अग्निशामक विभागाने तत्परतेने आगीवर नियंत्रण आणले.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
जोखीम पत्करून खोलीतील गॅस सिलिंडर मैदानात आणून ठेवले. आणखी सुदैव असे, की या खोलीत खाद्यपदार्थ तयार करीत असलेला कारागीर खोलीबाहेर जायला आणि ही दुर्घटना घडायला एकच गाठ पडली. त्यामुळे तो बालंबाल बचावला. ही थरारक घटना बुधवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडली. या भागात दीड ते दोन हजार लोक राहतात. सर्वांची घरे एकमेकांना खेटून आहेत. तेथील एका खोलीत गौर मंडल हा गॅस शेगडीवर खाद्यपदार्थ तयार करीत होता. त्याचा चुलता सुखदेव मंडल काही कामानिमित्त बाहेर गेला होता.
हे ही वाचा : बहुमत असूनही आरक्षण न निघाल्याने अनेक गावांत नाराजी
खाद्यपदार्थ तयार करीत असताना गौर मंडल खोलीबाहेर आला आणि तेवढ्यात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती, की फुटलेल्या सिलिंडरचे तुकडे अर्धा किमी अंतरापर्यंत जाऊन पडले. आजूबाजूचा परिसर हादरून गेला. ती खोली आगीच्या ज्वाळांनी वेढली, मात्र अग्निशामक बंब वेळेत दाखल झाला. कर्मचाऱ्यांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण आणले. पाठोपाठ खोलीतील सिलिंडर मैदानात आणून ठेवले. त्या भागातील नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, पोपट शिंदे यांनी रहिवाशांना सोबत घेऊन मदतकार्य केले.