esakal | घोडेगावात विक्रमी ८० हजार कांदागोण्यांची आवक; ६ कोटींची उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

Onion Market

घोडेगावात विक्रमी ८० हजार कांदागोण्यांची आवक; ६ कोटींची उलाढाल

sakal_logo
By
चंद्रकांत दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात विक्रमी ७९ हजार ५८६ कांदागोण्यांची आवक झाली. क्रमांक एकच्या कांद्यास दोन हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. चार तासांत सहा कोटी रुपयांची उलाढाल झाली. (Ghodegaon market received a record influx of onions)

आजच्या लिलावानिमित्त सोमवारी (ता. पाच) दिवसभर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली होती. सर्व भागांतून आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने, नगर-औरंगाबाद रस्त्यावर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. समितीसमोरील चौकात अनेकदा वाहतूक कोंडी झाली होती. लहान वाहने व ट्रक- टेम्पोंमुळे बाजार समितीचे आवार हाऊसफुल्ल झाले होते. आज बाजार समितीच्या सर्व अडतदारांच्या दुकानासमोर कांदागोण्यांच्या राशी लागल्या होत्या.

आज क्रमांक एकच्या कांद्यास २००० ते २२०० रुपये क्विंटल भाव मिळाला. क्रमांक दोनला १७०० ते १९००, तर क्रमांक तीनच्या कांद्यास १४०० ते १६०० रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा ८०० ते १२००, तर जोडकांद्यास ४०० ते ६०० रुपये भाव मिळाला.

कोरोना संकट लक्षात घेऊन बाजार समितीने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते, तरी येथील आवारात तीन हजारांहून अधिक जणांची गर्दी पाहयला मिळाली. प्रत्यक्ष भेटीत येथे अनेकांच्या चेहऱ्यांवर मास्क दिसले नाही. लिलावादरम्यान कुठेही सोशल डिस्टन्सिंग दिसले नाही. लिलाव सुरू असतानाच ट्रक भरून देण्याचे काम सुरू होते. येथे नव्याने सुरू झालेल्या २९ अडत दुकानांवर कांद्याची आवक समाधानकारक होती.

हेही वाचा: 'बीड-परळी-नगर रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी'

सध्या पेरणीचे दिवस असल्याने मशागत, खते, मजुरी व बियाणे घेण्याची नड असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत असल्याने येथील आवक वाढलेली दिसत आहे. येथील पारदर्शकता व चोख व्यवहारामुळे बाहेरच्या जिल्ह्यांतून येथे कांदा येऊ लागला आहे.

- सलीम बागवान, व्यापारी, घोडेगाव

(Ghodegaon market received a record influx of onions)

हेही वाचा: मालेगाव उपविभागात ४३ टक्के पेरण्या; पावसाअभावी कामे रखडली

loading image