गीर गायींमुळे उंचावले शीर....लॉकडाउनमध्येही विकले १२० रूपये लिटरने दूध

राजेंद्र सावंत
सोमवार, 29 जून 2020

चार वर्षांत गीर गायींची संख्या 35 झाली आहे. रोज शंभर लिटर दूध निघते. बीडहून मुंबईला जाणाऱ्या वाहनामधून हे दूध तो रोज विकण्यासाठी पाठवितो. तेथे दोन युवक दूध मॉलमध्ये पोच करतात. तब्बल 120 रुपये लिटरने दूध तेथे विकले जाते

पाथर्डी : नैसर्गिक व "झीरो बजेट' शेती करून परदेशात भाजीविक्री करण्याची कला वाळुंज येथील प्रगतिशील शेतकरी बद्रिनाथ आजिनाथ फुंदे याला साधली. जोडीला गीर गायींचा व्यवसाय होताच. दूध, तूप, पनीर यांपासून हा शेतकरी दरमहा पावणेदोन लाख रुपये उत्पन्न मिळवतो. त्याच्या गीर गायींचे दूध मुंबईतील मॉलमधून विकले जाते. 

वाळुंज येथील 32 एकर शेतीला कुंपण घालून आजिनाथ कुंडलिक फुंदे यांनी फळबाग लागवड केली. त्यांचा मुलगा बद्रिनाथ फुंदे हा पदवीधर. मात्र, नोकरीच्या बंधनात राहण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञान व नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय त्याने घेतला. एकाच शेतात 27 प्रकारच्या पालेभाज्यांचे उत्पन्न घेतले. पिकास रासायनिक खताऐवजी शेणखत व नैसर्गिक खतांवर भर दिला.

हेही वाचा - आमदार नीलेश लंके यांनी दिला दुकानदारांना डोस

सन 2017मध्ये त्याने मुंबई येथील व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने इस्राईलमध्ये सिमला मिरची विक्रीसाठी पाठविली. त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळविले. त्यानंतर त्याने दोन गीर गायी घेतल्या. त्यांचे संगोपन केले. आता चार वर्षांत गीर गायींची संख्या 35 झाली आहे. रोज शंभर लिटर दूध निघते. बीडहून मुंबईला जाणाऱ्या वाहनामधून हे दूध तो रोज विकण्यासाठी पाठवितो. तेथे दोन युवक दूध मॉलमध्ये पोच करतात. तब्बल 120 रुपये लिटरने दूध तेथे विकले जाते. त्यातून रोज 12 हजार रुपये उत्पन्न मिळते.

कोरोनामुळे वाहतूक बंद झाल्याने पाथर्डी शहरात तो दूधविक्री करतो. दूध, तूप, पनीर बनवून विकतो. त्यातून दरमहा पावणेदोन लाखांचे उत्पन्न मिळते. 

 
दुधासाठी आमच्याकडे आगावू नोंदणी झाली आहे. ग्राहकांना लागते तेवढे दूध आपण आज देऊ शकत नाही. मागणी खूप आहे. केलेल्या कष्टाचे मोल मिळते आहे. युवकांनी पुढे यावे, पारंपरिक शेतीकडून नैसर्गिकतेकडे वळावे. 
- बद्रिनाथ फुंदे, प्रगतिशील शेतकरी, वाळुंज 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gir cows make farmers rich