खते, बियाणांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक...आमदार लंकेंचा दुकानदारांना डोस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खते घेताना खत साठा शिल्लक नाही. किंवा खत घ्यावयाचे असेल तर इतर खरेदी करा, असा आग्रह केला जात आहे. 

पारनेर ः कोणतेही खत घ्या त्या बरोबर इतर बियाणे, औषधे घ्या तरच खते मिळेल असा आग्रह तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रात केला जात आहे. तर काही ठिकाणी युरीया शिल्लक असूनही तो दिला जात नसल्याच्या तक्रारी शेतक-यांनी थेट आमदार नीलेश लंके यांच्याकडे केल्या होत्या. त्या मुळे  लंके यांनी तालुका कृषी अधिकारी यांना अशा दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तालुक्यात यंदा समाधनकारक पाऊस झाला आहे. शेती मालाला बाजारभाव नाहीत. लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कर्ज काढून बी बियाणे व खते खरेदी करत आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खते घेताना खत साठा शिल्लक नाही. किंवा खत घ्यावयाचे असेल तर इतर खरेदी करा, असा आग्रह केला जात आहे. 

हेही वाचा - शिक्षक बँकेचे साडेतीनशे कोटी रूपये पडून

पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे शेतकरी  आनंदीत झाला  आहे. अनेक शेतमजुर व शेतक-यांना रोजगार नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यात अनेक कृषी सेवा केंद्र व खत विक्रेत्यांची मनमानी मुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत.

या संदर्भात तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, पारनेर येथील अनेक शेतकऱ्यांनी लंके यांच्याकडे तक्रार केली होती.    त्याचा पाठपुरावा करत आमदार लंके यांनी तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांच्याशी चर्चा करीत अशा संबंधित दुकानदारांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत.

बांधावर खतांचे काय झाले 

बांधावर खते व बियाणे या कृषी मंत्री दादा भुसे यांच्या घोषणेला तालुक्यातील कृषी सेवा केंद्रसंचालकांनी हरताळ फसला आहे. बांधावरच नव्हे तर दुकानात जाऊनही खते मिळेनात. खते हवीत तर इतर काही तरी माल घ्या अन्यथा खत शिल्लक नाही असा अलिखीत फतवाच तालुक्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी काढला आहे. त्यांच्या या  मनमानीला कृषी अधिकारी  पाठिशी घालतात अशी तक्रार अनेक शेतक-यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Lanke scolded the shopkeepers