शेती करायची तर अशी करा ः चारचाकीच्या किंमतीत विकली एक शेळी, बोकड्या आहे क्रेटा कारएवढा महाग!

सुनील गर्जे
Thursday, 11 February 2021

शेती अशी करा एकेका जनावराला लाखोंची किंमत मिळाली पाहिजे.

नेवासे : कोणतेही वाहन खरेदी करायचे झाल्यास खिशात किमान पाच ते सात लाख रूपये हवे असतात. आणखीच टॉप मॉडेल घ्यायचे झाले तर दहा लाखांशिवाय शो रूमची पायरी चढता येत नाही. परंतु शेतकऱ्यांकडील एकेका पशुचीही तेवढी किंमत झालीय. तुम्ही घोड्याबाबत ऐकलं असेल पण आम्ही त्याबाबत नाही बोलत. 

एकेका शेळीची आणि बोकड्याची तेवढी किंमत आहे. नेवासे तालुक्यातील भेंडे बुद्रुक येथील एका शेळीपालकाने ही किमया करून दाखवलीय. संदीप  मिसाळ असं या शेतकऱ्याचे नाव आहे. 

ते शेतीबरोबरच गेल्या चार-पाच वर्षांपासून शेळी पालनाचा (गोट फार्म) व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या गॉट फॉर्ममध्ये अफ्रिकन बोर जातीच्या नरापासून (बोकड) शंभर टक्के ब्रिडिंगच्या  १० ते १२ मादी, नव्वद टक्के ब्रिडिंगच्या तीन तर ८७ टक्के ब्रिडिंगच्या तीन  शेळया केल्या आहेत.

फलटण येथील एकाने सीडमधून मिसाळ यांनी या शेळ्या खरेदी केल्या. मिसाळ यांच्या या गोट फॉर्ममधील एका शेळीची नुकतीच विक्री झाली. ती फलटण येथील शेळी व्यावसायिक तेजस भोईटे यांनी  खरेदी केली. एका शेळीसाठी त्यांनी चक्क एक लाख ५१  हजार रुपयांची किंमत मोजली. 

एका शेळीसाठी जुन्या चारचाकी वाहनाच्या किंमतीएवढी रक्कम मोजणारे भोईटे म्हणतात  "पंचवीस वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आफ्रिकन बोर जातीच्या नरापासून (बोकड) शंभर ब्रिडिंग केलेल्या देशी शेळी आहेत. भारतात ही जात वाढविण्यात आलेली आहे.  या शेळीपासून होणारे बोकड-शेळीमध्ये जास्तीची रोग प्रतिकार शक्ती असते. 

हाडांची साईज मोठी होते. दर दिवसाला  २०० ते २५० ग्रॅम वजन वाढते. तीन महिन्यांत २५-३५ किलो वजन होते, अशी ही जात आहे.

हेही वाचा - अजितदादांच्या एका शब्दाने फिरलं राजकारण

खरेदी केलेली शेळी 2 वर्षे वयाची आहे. तिचे ७० किलो वजन आहे. सध्या ती गाभण आहे. तिचे हे तिसरे वेत आहे. एका वेळी २ ते ३ पिल्लांना जन्म देते. किमान दोन पिल्ले तर नक्की होतील आणि ते दोन-अडीच लाखांना विकले जातील, म्हणून तिला इतकी किंमत मोजली आहे, असे फलटणचे भोईटे सांगतात.

 

"ओरिजिनल आफ्रिकन बोर जातीच्या नरापासून शंभर टक्के ब्रिडिंग केलेली ही शेळी आहे. ओरिजिनल नराची (बोकड) किंमत ११-१२ लाख रूपयांचे पुढे आहे. त्यामुळेच या शेळ्यांना इतकी किंमत मिळते. 
- संदीप मिसाळ, समृद्धी गोट फार्म, भेंडे

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A goat sold for four wheelers in Nevasa!