प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांना 'गोल्डन एआयएम' राष्ट्रीय पुरस्कार

सुनील गर्जे
Wednesday, 4 November 2020

सर्वोत्कृष्ट व्यावसायिक ब्रॅंड आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रशासन व नेतृत्व बद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे सोनई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांना गोल्डन एआयएम या राष्ट्रीय पुरस्काराने ‘मोस्ट आयडियल प्रिन्सिपल’ म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार सर्वात प्रतिष्ठित सन्मान समजला जातो.

नेवासे (अहमदनगर) : सर्वोत्कृष्ट व्यावसायिक ब्रॅंड आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रशासन व नेतृत्व बद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे सोनई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांना गोल्डन एआयएम या राष्ट्रीय पुरस्काराने ‘मोस्ट आयडियल प्रिन्सिपल’ म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार सर्वात प्रतिष्ठित सन्मान समजला जातो. 

मुंबई येथील फेडरेशन ऑफ क्वालिटी एज्युकेशन कौन्सिल (एफक्यूईसी) व असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपल्स यांच्या सहकार्यातून डायनेर्जीक बिझनेस सोल्यूशन, मुंबई आयोजित  ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळा भारत सरकारच्या निती आयोगाचे संचालक कुमार संजय, असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपल्सचे अध्यक्ष राजुकुमार महाजन व स्टूडेंट्स प्रोग्रेशन अँड इंडस्ट्री रेलेशन्सचे विभाग प्रमुख व फेडरेशन ऑफ टीपीओचे चेअरमन प्रा. एस. पी. राव बोर्डे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.

प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांना विद्यार्थी व शिक्षक यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षणिक गुणवत्ता, व्यावसायिकता, संशोधन नवकल्पना आणि महाविद्यालय व्यवस्थापन इत्यादी सेवांची गुणवत्ता आणि योगदान या निकषांच्या आधारे हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. लावरे यांचा मुळा एज्युकेशन सोसायटीचे वतीने सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांच्याहस्ते प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कोल्हापूर, डॉ. अशोक तुवर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

डॉ. शंकर लावरे दृष्टीक्षेपात...
डॉ. शंकर लावरे यांनी २६ वर्ष पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. तर पाच वर्षापासून ते सोनई महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.  त्यांचे ४ पेटेंट, १०० राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय शोध निबंध, १५ क्रमिक पुस्तके व चार अंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथ प्रकशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १२ विद्यार्थ्यांनी पीएचडी संशोधन पूर्ण केले. डॉ. लावरे यांना यापूर्वी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले  आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden AIM National Award to Principal Shankar Laware