
राज्याच्या इतर भागात शिफ्ट झालेलं हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा नव्याने जामखेड तालुक्यातील कुसगाव येथे मंजूर करून घेतले. चार-पाच महिन्यापासून आमदार रोहित पवारांचा याकरिता पाठपुरावा सुरू होता.
जामखेडकरांसाठी गुड न्यूज ः कुसडगावात एसआरपीएफ-१९ला मंजुरी...रोहित पवारांनी खेचून आणले केंद्र
जामखेड :कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी आज एक विशेष बातमी आहे. ती म्हणजे राज्य राखीव दलाबाबत. ही खुशखबर अर्थातच आमदार रोहित पवार यांच्यामुळे मिळाली आहे. पाच महिन्यांपूर्वी कर्जतला एमआयडीसी मंजूर करून आणली होती.आता जामखेडसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 हे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. तेथे अकराशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची कुटुंबाची निवास व्यवस्था होणार आहे. त्यामुळे या भागातील सिक्युरिटीबरोबरच सर्वच अर्थकारणाला बळकटी मिळणार आहे.
हेही वाचा - इंदोरीकरमहाराजांवर गुन्हा दाखल
शेती, दुध, पालेभाज्या व अन्य लहान-मोठ्या व्यवसायिकांसाठी ही चांगली संधी ठरेल. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल. येथे सेवार्थ दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यामुळे परिसरातील शाळा- महाविद्यालयांना मोठी विद्यार्थी संख्या उपलब्ध होईल. सर्वांसाठीच हे प्रशिक्षण केंद्र पर्वणी ठरेल.
वैभवात पडेल भर
आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यानंतर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले. या प्रशिक्षण केंद्रांमुळे जामखेड तालुक्याच्या वैभवात भर पडेल. जामखेडची ओळख राज्याच्या नकाशावर ठळकपणे होईल. रोहित पवार आमदार झाल्यापासून कर्जत- जामखेड हा मतदारसंघ राज्यात निरनिराळ्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे.
या भागातील अनेक प्रश्न प्रलंबित प्रश्न प्रलंबित योजना मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. अनेक योजनांना हिरवा कंदील मिळवला. त्यामुळे मतदारसंघाची मान निश्चितपणे उंचावणार आहे.
जाणून घ्या - पत्रकारांनो लायकीत रहा, मी मॅडमला हप्ते देतो..तहसीलदारांच्या फेसबुवरील मजकूर
यासंदर्भात अधिक माहिती अशी; जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे दोन वर्षांपूर्वी,राज्य राखीव पोलीस बल गट क्र,19 पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली होती. मात्र, हे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यात हलवण्यात आल्याने जामखेडकरांना मिळालेली महत्वकांक्षी योजना हातातून गेली होती. मात्र, हे पोलिस प्रशिक्षण केंद्र पुन्हा कुसडगावलाच व्हावे याकरिता आमदार रोहित पवारांनी राज्याच्या मंत्रीमंडळात आपले वजन वापरले.
सातत्याने सुरू होता पाठपुरावा
राज्याच्या इतर भागात शिफ्ट झालेलं हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा नव्याने जामखेड तालुक्यातील कुसगाव येथे मंजूर करून घेतले. चार-पाच महिन्यापासून आमदार रोहित पवारांचा याकरिता पाठपुरावा सुरू होता. अशी माहिती त्यांनी ई-सकाळ शी बोलताना दिली. हे पोलीस प्रशिक्षण केंद्र याठिकाणी झाल्याने सेफ्टी आणि सिक्युरिटी चा चांगला फायदा होणार आहे. हे सेंटर नगरसाठी एकुलते एक आहे. त्यामुळे नगरला मोठी मदत होईल. सोलापूर, उस्मानाबाद, बीड या शेजारच्या जिल्ह्यांनाही या प्रशिक्षण केंद्राची मदत होणार आहे.
गेली चार-पाच महिन्यांपासून प्रयत्न करुन जळगावात गेलेले राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र पुन्हा नव्याने कुसडगावला मंजूर करून घेतले. ते लवकरच मार्गी लागेल. याचा फायदा नगरसह परिसरातील चार जिल्ह्याला होणार आहे.
- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड.