शिर्डीतील गुरूजींना गुगलनेही ठोकला सलाम

सतीश वैजापूरकर
Wednesday, 23 December 2020

""तालुक्‍याच्या दृष्टीने ही भूषणावह बाब आहे. "गुगल'ने राज्यातील 40 शिक्षकांची निवड केली होती. त्यातून एकमेव शिक्षक अजमत इकबाल यांची निवड झाली.

शिर्डी ः लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने इंग्रजी विषय शिकविणारे राज्यातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून "गुगल'ने येथील सरकारी ऊर्दू शाळेतील शिक्षक अजमत इकबाल यांची निवड केली. त्यांनी लॉकडाऊनमध्ये "गुगल ऍप' व "यू-ट्यूब चॅनेल'द्वारे त्यांच्या शाळेतील आठवी ते दहावीपर्यंतच्या 180 विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकविला. नियमीत परीक्षाही घेतल्या. त्यांच्या या प्रयत्नांवर "गुगल'ने माहितीपट तयार केला असून, "गुगल'द्वारे लवकरच तो प्रदर्शित केला जाणार आहे. 

"सकाळ'शी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे म्हणाले, ""तालुक्‍याच्या दृष्टीने ही भूषणावह बाब आहे. "गुगल'ने राज्यातील 40 शिक्षकांची निवड केली होती. त्यातून एकमेव शिक्षक अजमत इकबाल यांची निवड झाली. एवढेच नव्हे, तर "गुगल'च्या टीमने हा माहितीपट तयार करताना, सरकारी ऊर्दू शाळेत मुले शेजारच्या गावातून सायकलवर कसे येतात, त्यांचे पालक त्यासाठी कसे कष्ट घेतात, शाळेत त्यांच्यासाठी काय सुविधा व अडचणी आहेत, याचीही नोंद माहितीपटात घेतली आहे.'' 

हेही वाचा - सुनंदा पवार का आहेत जामखेडकरांवर नाराज

शिक्षक अजमत इकबाल म्हणाले, ""लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शिक्षकांना राज्य सरकार व "गुगल'ने मिळून ऑनलाइन शिक्षण कसे द्यायचे, याचे दोन दिवस प्रशिक्षण दिले. त्यानुसार मी "गुगल मिट'द्वारे शिकविण्यास सुरवात केली. मात्र, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते. मग, "यू-ट्यूब चॅनेल' सुरू करून त्यावर व्हिडीओ अपलोड केले. "गुगल फॉर्म ऍप'द्वारे विद्यार्थ्यांच्या नियमीत परीक्षा घेतल्या. त्यांच्या प्रतिक्रिया आजमावल्या. त्याची नोंद ठेवली. हा वेगळा प्रयत्न होता. त्याला चांगले यश मिळाले. त्यामुळे "गुगल'ने माझी निवड केली असावी. त्यांचे अधिकारी दोन महिन्यांपासून संपर्कात होते.'' 

मागील पंधरवड्यात माझी मुलाखत घेतली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी माझी राज्यभरातून एकमेव शिक्षक म्हणून निवड जाहीर केली. गेल्या तीन दिवसांपासून "गुगल'च्या टीमने येथे येऊन आमची शाळा व माझ्या प्रयत्नांबाबत माहितीपट तयार केली. मला त्याचा खूप आनंद व अभिमान वाटला. हे यश मिळाल्यानंतर शाळेचे विश्वस्त हाजी अब्दुल गनी, हाजी बिलाल, शौकत सय्यद, बाबा सय्यद व नसीर दारूवाले यांनी सत्कार केला. या यशात माझ्या विद्यार्थ्यांचा देखील मोलाचा वाटा असल्याचे इकबाल म्हणाले. 

शिर्डी येथील ऊर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षक अजमत इकबाल यांनी कल्पकता व अध्ययनावरील निष्ठा, याचे दर्शन घडविले. यानिमित्त "गुगल'सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीने एका प्राथमिक शिक्षकाच्या धडपडीची दखल घेतली. शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने ही गौरवाची बाब आहे. 
- आमदार राधाकृष्ण विखे पाटील , शिर्डी, अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google also saluted Guruji in Shirdi