Ahmednagar News : गावोगावची हागणदारी हटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 government built seven lakh toilets in ahmednagar

Ahmednagar News : गावोगावची हागणदारी हटली

अहमदनगर : स्वच्छतागृहांसाठी अनुदान देऊनही ती बांधली जात नव्हती. बांधली तरी त्यांचा वापर केला जायचा नाही. मग गावोगावी गुडमॉर्निंग पथके पाठवली जायची. उघड्यावर शौचविधी करणाऱ्यांची छायाचित्र काढली जात.

त्यांच्याकडून दंड आकारला जाई. साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची ही स्थिती आता बदलली आहे. गावोगावी स्वच्छतागृहे झाली आहेत. ६ लाख ९४ हजार स्वच्छतागृहे बांधली गेलीत. त्यामुळे गावोगावची हागणदारी हटल्याचे चित्र आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातून वैयक्तिक स्वच्छतागृहे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, तसेच गावात सांडपाणी प्रकल्प राबविले जात आहेत. गेल्या पंधरा वर्षांत शासनाने केलेल्या अभियानातून ही परिस्थिती बदलली आहे. यापूर्वी संपूर्ण स्वच्छता अभियान राबविले जाई.

त्यात हागणदारीमुक्त गाव उपक्रम राबविला जाई. त्याविषयी जनजागृती केली जायची. आठवडे बाजार, जत्रा-यात्रांतून हे रथ फिरवले गेले. शालेय स्तरावरही निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांतून जनजागृती केली गेली.

या प्रबोधनातून परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील वैयक्तिक स्वच्छतागृहांच्या संख्येचा आढावा घेतला असता, गावोगावची हागणदारी हटल्याची स्थिती आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ५० ते ५५ लाखांच्या घरात आहे. कुटुंबांची संख्या आहे अकरा लाख.

सात लाख स्वच्छतागृहे बांधलीत. यात शहरी भागातील तसेच २०१४ पूर्वीच्या स्वच्छतागृहांची संख्या नाही. त्यामुळे जवळपास सर्वच कुटुंबांकडे स्वच्छतागृह आहे. २०२२ मध्ये ७ हजार स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट होते. यासाठी ६ हजार ३९८ जणांनी अर्ज केले. त्यांतील ६ हजार १९८ पूर्ण झाली, तर काही प्रगतिपथावर आहेत. मार्चअखेर त्यांत आणखी भर पडेल.

सार्वजनिक शौचालये, तृतीयपंथीयांसाठी सोय

ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक शौचालये बांधली जात आहेत. जवळपास निम्म्याहून अधिक जिल्ह्यांत ही शौचालये उभारली आहेत. त्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जाते. साधारणपणे सव्वादोन लाखांचा त्यासाठी निधी आहे.

या वर्षी २३५ ग्रामपंचायतींकडून मागणी आली होती. त्यातील २११ शौचालयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. १३५ कामे प्रगतिपथावर आहेत. या स्वच्छतागृहांत एक पुरुषांसाठी, एक महिलांसाठी, तर तिसरे तृतीयपंथीयांसाठी. स्वच्छतेची व्यवस्था ग्रामपंचायतींकडून केली जाते.

सांडपाणी व्यवस्थापन

गावांत आता वैयक्तिक स्वच्छतागृहे, तसेच सार्वजनिक शौचालयेही उभारलेली दिसतात. गावातील कचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन केले जाते. त्यासाठी सांडपाणी प्रकल्प उभारला जात आहे. परिणामी, गटारेही गायब होत आहेत.

या वर्षी ७६९ गावांत हा कृती आराखडा होता. त्यांतील ६७८ प्रकल्पांना तांत्रिक मान्यता दिली आहे. ६७३ कामांना प्रशासकीय मान्यता झाली आहे. ४८० कार्यारंभ आदेश आहेत. त्यांत २५६ कामे पूर्णत्वास गेली असून, १४५ प्रगतिपथावर आहेत.

कुटुंबांची संख्या

  • अंत्योदय - ८७ हजार ७८१

  • प्राधान्य गट - ६ लाख १ हजार ९९१

  • केसरी - ३ लाख ५० हजार १४२

  • सफेद - ५८ हजार ६३२

  • स्वच्छतागृहे - ६ लाख ९४ हजार