स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्याबाजारात चालल्याचा आला संशय अन

सचिन सातपुते
रविवार, 2 ऑगस्ट 2020

शेवगाव येथील शासकीय गोदामातून स्वस्त धान्य घेऊन आज दुपारी गाडे ट्रान्सपोर्ट, नगर यांचा टेम्पो (एमएच 16 एई 3350) खानापूरला आला

शेवगाव : स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी नेत असल्याच्या संशयावरून खानापूर येथे आज दुपारी ग्रामस्थांनी तीन तास टेम्पो अडवून धरला.

अखेर पोलिस व महसूल अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर शहरातील शासकीय गोदामात टेम्पो आणला. तेथे स्वत: तहसीलदार अर्चना भाकड यांनी धान्याची पडताळणी केली. टेम्पोतील धान्य वैध आढळून आल्यावर ग्रामस्थांनी सुस्कारा सोडला. 

शेवगाव येथील शासकीय गोदामातून स्वस्त धान्य घेऊन आज दुपारी गाडे ट्रान्सपोर्ट, नगर यांचा टेम्पो (एमएच 16 एई 3350) खानापूरला आला. तेथे 27 क्विंटल गहू व 17 क्विंटल तांदूळ, तसेच दहिफळ येथील गरीब कल्याण योजनेचा साडेआठ क्विंटल तांदूळ, असा एकूण 52.50 क्विंटल गहू व तांदूळ आणला होता.

हेही वाचा - नगरमध्ये कोरोनाचे ४०३ रूग्ण

खानापूर येथे दुपारी स्वस्त धान्य दुकानासमोर टेम्पो उभा केला असता, टेम्पोत प्रमाणापेक्षा जास्त धान्य असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. हे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी सुमारे तीन तास टेम्पो अडवून धरला.

या बाबत तहसीलदार भाकड यांना माहिती दिली. त्यांनी पुरवठा विभागाचे गोदाम कीपर सोमनाथ आव्हाड व पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे यांना तातडीने खानापूर येथे पाठविले. मालाच्या पावत्या व धान्य बरोबर असल्याचे गोदाम कीपर आव्हाड यांनी ग्रामस्थांना सांगितले. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने ग्रामस्थांनी धान्य उतरू देण्यास विरोध केला.

अखेर सर्व माल पुन्हा शासकीय गोदामात आणला. तेथे तहसीलदार भाकड यांनी स्वत: पडताळणी केली असता, सर्व माल वैध असल्याचे स्पष्ट झाले. 

 
स्वस्त धान्याबाबत काही तथ्य असल्यास तक्रार करा. मात्र, विनाकारण तक्रार करून कोरोना संकटात लाभार्थींना धान्यापासून वंचित ठेवू नका, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. 
- अर्चना भाकड, तहसीलदार, शेवगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grain theft caught in Shevgaon