स्वातंत्र्यानंतर प्रथमच 'मोरया चिंचोरे' ग्रामपंचायत बिनविरोध ; प्रशांत गडाखांचा नवा पायंडा

Gram Panchayat Election moraya chinchore unoppossed prashant gadakh.jpg
Gram Panchayat Election moraya chinchore unoppossed prashant gadakh.jpg

नेवासे (अहमदनगर) : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आदर्श गाव मोरयाचिंचोरे गावची ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आपले उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या इच्छुकांना सत्कार 'लक्ष्मीतरू'चे वृक्षरोप व पुस्तक देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान गडाखांनी घालून दिलेला हा नवा पायंडा आगामी काळात इतर गावांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

प्रशांत गडाख म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्यापेक्षा माघार घेणाऱ्यांचा मनाचा मोठेपणा महत्वाचा आहे. माझ्या दृष्टीने त्यांचे हे योगदान गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. म्हणूनच माघार घेणारे माझ्या मनात निवडून आलेल्या इतकेच महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केले. 

जिरायत पट्ट्यातील परंतु राजकीय, सामाजिक दृष्ट्या तंटायुक्त समजल्या जाणाऱ्या नेवासे तालुक्यातील मोरया चिंचोरे गाव यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या सातत्यशिल प्रयत्नाने गुद्दयावरून चक्क विकासाच्या मुद्द्यांवर आल्याची किमया येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रथमच बिनविरोध झाल्याने साकार झाली आहे. 

मोरयाचिंचोरे हे गाव नेवासे तालुक्याच्या दक्षिणेला टोकाचे कायमच अवर्षणग्रस्त स्थिती असलेले आडवळणी गाव. गावातील बहुसंख्य ग्रामस्थही टोकाची भूमिका घेणारे. त्यामुळेच सामाजिक, राजकीय पातळीवर सतत अशांतता गावाच्या पाचवीलाच पुजलेली. अवैध धंद्यांमुळे त्यात मोठी भरच पडलेली. पावसावर अवलंबून शेती असल्याने इतर काळात दूरदूर नजर जाईल तिकडे उजाड माळरान दिसे. त्यामुळे गावात ज्यांना चिड होती त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवून शिक्षण पूर्ण झाल्यावर तिकडेच नोकरी पाहून तिकडेच राहण्याचा सल्ला दिलेला. एकूणच काय तर तालुक्याच्या दृष्टीने दुष्काळी व तंटायुक्त गाव असा मोरयाचिंचोरे गावाचा उल्लेख व्हायचा.
     
अशी पार्श्वभूमी असलेले गाव कधी काळी 'आदर्श' सदरात मोडेल अशी कल्पना स्वप्नातही कोणी केली नसेल. परंतु हे प्रत्यक्षात उतरवलंय ते यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष 'प्रशांत पाटील गडाख' नावाच्या अवलियाने. भरभक्कम राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीत जीवन जगणाऱ्या कुटुंबातील तरुण सहसा गावगाड्याच्या फंदात पडत नाहीत. परंतु रक्तातच अजब रसायन भरलेल्या या अवलियाने चक्क मोरया चिंचोरे गावालाच सुधारविण्याच्या विडा काही वर्षांपूर्वी उचलला. केवळ एवढ्यावरच न थांबता त्याने या गावाचा संपूर्ण कायापालट करून दाखवला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी शासन, लोकसहभाग तसेच स्वतःच्या खर्चातून गावात रचनाबद्ध विकासकामे करून दाखविली. 

गावातील संघर्षाचे सर्वात मोठे कारण ग्रामपंचायत, सहकारी संस्थेच्या निवडणुकीत असल्याचे ओळखून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत राजकारण हे गावाच्या विकासासाठी असते, ते आपसातील हेवेदावे, सूड भावना जोपासण्यासाठी नसते, हे पटवून देण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळा नाहक गैरसमज वाढून गावातील काही लोक त्यांच्यावरही डाफरले. परंतु प्रशांत गडाख यांनी आपला संयम सोडला नाही. प्रशांत गडाख यांची यामागील प्रामाणिक भूमिका समजण्यासाठी बराच मोठा कालावधी जावा लागला. परंतु त्यांच्या पोटतिडकीने सांगण्याचा ज्यावेळी या लोकांना प्रत्यय आला, त्यावेळी जणू त्यांचे डोळे खाडकन उघडले. त्यांनी त्यानंतर प्रसन्न मनाने गडाख यांच्यासोबत स्वतःला गावाच्या विकासासाठी झोकून दिले. 

मोरयाचिंचोरे गावाची वैचारिक एकता झाल्याने उत्साह वाढलेल्या गडाखांनी 'यशवंत ग्रामसंसद' ही ग्रामपंचायत सुसज्ज इमारत बांधून घेतली. गावातील विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींची गावातच शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, यशवंत हॉस्पिटल, यशवंत वाचनालय आदी उपक्रम सुरू केले. यशवंत अमृत वृक्ष प्रकल्पअंतर्गत एक लाख वृक्ष लागवड व संगोपन, वनपर्यटन सुविधा केल्या. गावचे श्रद्धास्थान हभप पोटे महाराज समाधी स्थळाचा सर्वांगीण विकास, महात्मा गांधींचे शिल्प, दशक्रिया विधी घाट, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, गावाच्या अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण व दुतर्फा वृक्ष लागवड आदी विकासात्मक कामे केली.

कॉंक्रीट बंधारे, बांधबंदिस्ती, सलग समतल चर अशी जलसंधारणाची कामे झाल्याने हंगामी असलेला शेती व्यवसाय शाश्वत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या गावाचा झालेला कायापालट हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय असल्याने व काहींचा यावर विश्वासच बसत नसल्याने येथे भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी 'झोपडी' हे आकर्षक अतिथीगृह येथे बांधण्यात आले आहे.

प्रशांत गडाखांचा शब्द ग्रामस्थांनी पाळला !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच पोपटराव पवार यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रशांत गडाख यांनी मोरयाचिंचोरे गावाचा कायापालट केला. आदर्श गावची निवडणुका बिनविरोध करण्याची राज्यातील परंपरा यावेळी मोरयाचिंचोरे जोपासली असल्याचे दिसून आल्याने हा राज्यात कुतूहलाचा विषय ठरला आहे. दरम्यान कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना प्रशांत गडाख यांनी मोरया चिंचोरे गावाचा विकास ग्रामस्थांच्या एकजुटीने होत आहे, मात्र गावातील निवडणूक बिनविरोध होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
 
त्यातूनच प्रेरणा घेत ग्रामस्थांनी प्रशांत गडाखांचे विचारास प्रतिसाद देत ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करत गडाखांचा शब्द जपला. याकामी जिल्हा परिषदचे सभापती सुनील गडाख व युवा नेते उदयन गडाख यांनीही प्रयत्न केले. यामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच मोरया चिंचोरे गावाची निवडणूक बिनविरोध झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com