ग्रामपंचायत निवडणुकीने बांधावरच्या देवाचेही वाढले भक्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

सध्या राज्यातील बहुतेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. आपल्या प्रचाराची सुरवात या देवतांना स्मरूनच केली जाते.

नगर तालुका ः ग्रामपंचायत निवडणुकीत रंग भरायला आता सुरवात झाली आहे. गावातील अपक्षांसह गावकीच्या राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकलेले पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ करीत आहेत.

आपल्यावर आपल्या भागातील सर्वच दैवतांची कृपा व्हावी म्हणून बहुतेक उमेदवार गावातील, शेतातील, शिवेवरील दैवतांना नारळ वाढवून नवस करीत आहेत. त्यामुळे दूर असलेल्या दोन गावांच्या शिवेवरील देवांच्या ठिकाणीही उमेदवारांची गर्दी होऊन नारळ वाढविले जात आहेत. 

गाव म्हटले, की ग्रामदेवतेपासून ते अगदी शिवेवर, बांधावर असलेल्या देवतांना विशेष महत्त्व ग्रामीण भागात पिढ्यान्‌पिढ्या प्राप्त झाले आहे. प्रत्येक गावात ग्रामदेवतेबरोबरच अन्य देवतांनाही विशेष मान असतो.

हेही वाचा - गावकीचं इलेक्शन बिलेक्शन - अपक्षाच्या नाकदुऱ्या काढताना प्रमुखांची तारांबळ

सध्या राज्यातील बहुतेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. आपल्या प्रचाराची सुरवात या देवतांना स्मरूनच केली जाते. एरवीही वर्षभरातून एकदा यात्रेनिमित्त या देवतांना श्रीफळ, नैवेद्य अर्पण केला जातो.

निवडणुकीनिमित्त गावातील अपक्षांसह प्रत्येक पॅनलचे सर्व उमेदवार ग्रामदेवतांपासून खंडोबा, म्हसोबा, बहिरोबा, जोखाई, वाघाई, बीबीआई, तसेच दर्ग्याच्या ठिकाणी पोतेभर श्रीफळ वाढवून गोणीभर खडीसाखरेच्या प्रसादाचे वाटप करीत आहेत.

ढिगभर पुष्पहार व फुलांच्या चादरी अर्पण करीत गावाच्या शिवेपासूनच ढोल, ताशा, हलगीचा निनाद करीत नेत्याचा, उमेदवाराचा व पॅनलचा जयघोष करीत प्रचाराचा धूमधडाका लावला गेला आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat elections have also increased the number of devotees of God in the field