हाऊ दी जोश आजोबा ः चोपन्नाव्या वर्षी झाले मॅट्रीक...आता कॉलेजातही जायचं म्हणताय

गौरव साळुंके
Thursday, 30 July 2020

तब्बल ५४व्या वर्षी एका व्यक्तीने दहावीची परीक्षा दिली. अनिल भनगडे असे त्यांचे नाव आहे. ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. उतारवयाकडे झुकत असतानाही त्यांनी दहावीचा उंबरा ओलांडण्याचा निर्णय घेतला.

श्रीरामपूर ः इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात बहुतांशी विद्यार्थ्यांनी मुबलक गुण मिळवले. अगदी स्कोर शंभर टक्क्यांपर्यंत गेला. नेवाशातील विद्यार्थ्याने तर कमालच केली. त्याला सर्वच विषयात एकसारखे ३५ गुण मिळाले.

कुणी केले नाही ते रेकॉर्ड केल्याचा आनंद पास झाल्यापेक्षाही जास्त होता. त्याच्या शाळेतील शिक्षकांनी तसेच संस्थाचालक प्रशांत पाटील गडाख यांनीही हा आनंद सेलिब्रेट केला. 

श्रीरामपूर तालुक्यातही दहावीच्या निकालात अशीच घटना घडली. तब्बल ५४व्या वर्षी एका व्यक्तीने दहावीची परीक्षा दिली. अनिल भनगडे असे त्यांचे नाव आहे. ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. उतारवयाकडे झुकत असतानाही त्यांनी दहावीचा उंबरा ओलांडण्याचा निर्णय घेतला. काही कारणाने त्यांचे शिक्षण अर्धवट सुटले होते. त्यामुळे त्यांनी परीक्षा देण्याचे ठरवले होते.

हेही वाचा - सोनईच्या विद्यार्थ्याला सर्वच विषयात एकसारखे गुण

त्यांना शिक्षणाची आवड होती. मात्र, बालपणातच कुटूंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. त्यामुळे त्यांचे शिक्षण सातवीच सुटले. शिक्षण सुटल्यानंतर काही वर्ष त्यांनी कुटुंबासाठी रिक्षा चालवून उदर्निवाह केला.

त्यांच्या मनात कायम शिक्षणाची इच्छा होती. त्यातूनच त्यांनी 2017 साली शहरातील एका रात्र शाळेत इयता सातवीला प्रवेश घेतला. काम आणि वेळेचे नियोजन करुन रात्र शाळेत दहावीपर्यंत ते पोहोचले. आणि एकदाचे दहावीचा टप्पा त्यांनी यशस्वीरित्या ओलांडला. 

वय झाले असले तरी शिक्षणाची आवड कायम असल्याने पुढील काळात त्यांना कॉलेजही करायचे आहे. त्यानंतर कायद्याचे ज्ञान अवगत करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. त्यासाठी त्यांना हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांची प्रेरणा मिळाली. रात्र शाळेचे अध्यक्ष दीपक कुऱ्हाडे यांनीही त्यांना सहकार्य केले.

वयाच्या 54 व्या वर्षी दहावीची परीक्षा देत असल्याने अनेकांनी त्यांची चेष्टा केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन अभ्यासातुन परीक्षेची तयारी केली. परीक्षा देण्यासाठी वर्गात जातांना अनेक जण त्यांच्याकडे पाहुन आश्चर्य व्यक्त करीत. परंतु त्यांकडे कानाडोळा करीत यशाला गवसणी घातली.

भनगडे यांना दोन मुले आणि दोन मुली अशी चार अपत्य आहेत. त्यातील मोठी मुलगी ही दहावी उत्तीर्ण झाली असून तिचा विवाह झाला आहे. तिला दोन मुले आहेत. एक मुलगा दहावीला गेला असून दुसरा नववीत शिकत आहे. नातू अंगाखांद्यावर खेळायच्या वयात भनगडे यांनी दहावी पूर्ण केली. त्यांचे कुटुंब सामाजिक आहे. प्रत्येक सामाजिक कामात ते अग्रस्थानी असतात.

शिक्षणासाठी वयाची अट नसते. शिकण्याची अवड असली तर सवड मिळते. या यशाबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बनकर, हेरंब आवटी, सुनिल रामदासी, सुनील वाणी, बबन मुठे, अशोक उपाध्ये, संजय छल्लारे, सुधिर वायखिंडे यांनी भनगडे यांचे अभिनंदन केले. ते सध्या शहरात आणि तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandfather passed the matriculation examination