सावेडी नाट्यसंकुलास आले पाच कोटींचे अनुदान, आमदार जगताप यांची माहिती

अमित आवारी
Saturday, 9 January 2021

महापालिकेने शासनातर्फे मिळणाऱ्या अन्य अनुदानातून काही तरतूद केली होती; पण साधारणपणे आणखी अंदाजे सात ते आठ कोटी रुपये कमी पडत होते.

नगर : ""सावेडी नाट्यसंकुलाचा प्रश्‍न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्यासाठी पाच कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर झाले आहे,'' अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. 

ते म्हणाले, ""सावेडी नाट्यसंकुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सन 2011मध्ये शासनातर्फे सावेडी नाट्यगृहासाठी दोन कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर झाले होते; पण त्यानंतर कामाची व्याप्ती व आसनक्षमता पाहता, अंदाजे 11 कोटींच्या आसपास खर्च येणार होता.

हेही वाचा - विधवा भावजयीसोबत लहान दिराची लग्नगाठ

महापालिकेने शासनातर्फे मिळणाऱ्या अन्य अनुदानातून काही तरतूद केली होती; पण साधारणपणे आणखी अंदाजे सात ते आठ 
कोटी रुपये कमी पडत होते. त्या अनुषंगाने सावेडी नाट्यगृहासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उर्वरित निधीची मागणी करण्यात आली होती.

राज्यस्तरीय व विभागीय जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी पाच कोटी रुपये तरतूद करण्याचे आदेश जिल्हा नियोजन मंडळाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच अद्ययावत असे सावेडी नाट्यगृह नगरकरांसाठी उपलब्ध होईल. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A grant of Rs 5 crore came to Sawedi Natyasankulus, information of MLA Jagtap