आंबटशौकिनांसाठी दारूविक्री सुरू; दारूविक्रीच्या निषेधार्थ महिला नेत्याचे अनोखे आंदोलन

In Gurgaon a vote was taken for a ban on alcohol four years ago
In Gurgaon a vote was taken for a ban on alcohol four years ago

श्रीगोंदे (अहमदनगर) : घारगाव येथे चार वर्षांपूर्वी दारूबंदीसाठी मतदान झाले. मात्र, काही दिवसांपासून येथील ढाब्यांवर जोरात दारूविक्री सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ महिला संघटनेच्या नेत्या संगीता खामकर यांनी तेथील आठवडेबाजारात अनोखे आंदोलन केले. दारूच्या बाटल्यांमध्ये रंगीत पाणी भरून दारूविक्रीचे प्रतिकात्मक आंदोलन केले. त्यांचा रोष बेलवंडी पोलिसांवर होता. त्यामुळे आंदोलन सुरू होताच, बेलवंडी पोलिसांनी कारवाई करीत त्यांना पोलिस ठाण्यात नेले.

घारगाव येथे चार वर्षांपूर्वी दारूबंदी झाली. त्यासाठी संगीता खामकर यांच्या पुढाकारातून गावातील महिला एकजुटीने पुढे आल्या. बाटली आडवी करण्यासाठी महिलांनी मोठे परिश्रम घेतले. त्यांचा विजय झाला. काही काळासाठी दारू बंद झाली, मात्र गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा या भागात मोठ्या प्रमाणात दारूविक्री राजरोसपणे सुरू होती. काही ढाबाचालक दारूविक्री करीत नसले, तरी अनेकांनी विकण्यास सुरवात केल्याने गावात तळीरामांचा सुळसुळाट झाला.

खामकर यांनी याबाबत पाठपुरावा केल्यावर पोलिस कारवाई करीत होते; मात्र तरीही दारूबंदी होत नव्हती. त्यामुळे कंटाळून शेवटी खामकर यांनी 'खुशखबर, येथे गावातील आंबटशौकीनांसाठी दारूविक्री सुरू आहे' असा फलक झळकावत बाटल्यांमध्ये रंगीत पाणी भरून भर बाजारात विक्रीसाठी आणल्या. त्यांचे आंदोलन पोलिसांसाठी अडचणीचे ठरणार असल्याचे दिसताच, खामकर यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
 
खामकर म्हणाल्या, की आमचा पोलिसांवर रोष नाही, मात्र त्यांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे करावे. दारूबंदी करा, दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीबाबत आम्ही पाठपुरावा करीत आहोत. यापुढे दारू बंद झाली नाही, तर पोलिस अधीक्षक कार्यालयात आंदोलन करू.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com