शिर्डीत साईबाबांच्या हयातीतच सुरू झाली गुरूपौर्णिमा, साईचरित्र पारायणाचा मान कोरोना योद्‌ध्यांना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

मागील श्री रामनवमी उत्सवात सोशल डिस्टन्सिंगच्या मुद्द्यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून या उत्सवात संस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीसे अलिप्त राहणे पसंत केले.

शिर्डी ः यंदा भाविकांविना पार पडत असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवास आज परंपरागत पद्धतीने प्रारंभ झाला. उत्सवानिमित्त द्वारकामाई मंदिरात झालेल्या साईचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचा मान कोरोना योद्धे डॉक्‍टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना देण्यात आला.

साईचरित्र ग्रंथाच्या मिरवणुकीचा मान मंदिर पुजाऱ्यांना देण्यात आला. हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

एकशे बारा वर्षांपूर्वी बाबांच्या तत्कालीन भक्तांनी त्यांचे पूजन करून येथे पहिला गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. यंदा बाबांच्या समाधीची नित्यपूजा व आरती ओवाळण्याचे काम करणाऱ्या पुजाऱ्यांना साईबाबांच्या ग्रंथांची मिरवणूक काढण्याचा मान देण्यात आला. ज्येष्ठ पुजारी उदय वाळुंजकर यांच्या हस्ते "श्रीं'ची सपत्नीक पाद्यपूजा करण्यात आली. यापूर्वी संस्थान सेवेत असलेल्या पुजाऱ्यांना कधीही अशी संधी देण्यात आली नाही. 

हेही वाचा - आमदार नीलेश लंके यांनी शिवसेनेला पाडले खिंडार

एरवी भाविकांची अलोट गर्दी आणि विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा उत्सव पार पडतो. त्या काळात ग्रंथाच्या मिरवणुकीपासून पाद्यपूजेपर्यंत सर्व धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी साई संस्थानचे विश्‍वस्त व अधिकारी उत्सुक असतात. त्यावरून बऱ्याचदा रुसवे फुगवे होतात.

मागील श्री रामनवमी उत्सवात सोशल डिस्टन्सिंगच्या मुद्द्यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून या उत्सवात संस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीसे अलिप्त राहणे पसंत केले.

एरवी उत्सवानिमित्त द्वारकामाई मंदिरात होत असलेल्या अखंड पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील भाविक व ग्रामस्थ उत्सुक असतात. त्यासाठी सोडत काढावी लागते. यंदा भाविकांविना उत्सव पार पडत आहे.

क्लिक करा - दुःखद बातमी - माजी मंत्री राम शिंदे यांच्या वडिलांचे निधन

साई संस्थानच्या धर्मशाळेत उभारलेल्या कोरोना उपचार केंद्रात काम करणारे डॉक्‍टर व परिचारिकांना पारायण सोहळ्यात सहभागी होण्याचा मान देऊन संस्थान प्रशासनाने चांगला निर्णय घेतला.

संस्थानचे मुख्य लेखापाल बाबासाहेब घोरपडे व संस्थान रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे हे या अध्याय वाचनात सहभागी झाले. पुजारी दिलीप सुलाखे, विलास जोशी, चंद्रकांत गोरकर व साईमंदिर विभागप्रमुख रमेश चौधरी यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभाग घेतला. 

 

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई संस्थानच्या कोरोना योद्‌ध्यांना द्वारकामाई मंदिरात साईचरित्र पारायण करण्याचा सन्मान दिला. आम्हा सर्वांना याचा खूपच आनंद झाला आणि अभिमानदेखील वाटला. 
- वैशाली सुर्वे, परिचारिका, साई संस्थान रुग्णालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gurupournima started in Sai Baba's life in Shirdi