बाजार समितीवर केलेले हराळ यांचे आरोप बिनबुडाचे : घिगे

दत्ता इंगळे
Saturday, 3 October 2020

विकासकामांच्या नावाखाली जिल्हा परिषदेतून प्रचंड माया जमा केली. शेतकऱ्यांना मुदत संपलेली औषधे विकली.

नगर : विकासकामांच्या नावाखाली जिल्हा परिषदेतून प्रचंड माया जमा केली. शेतकऱ्यांना मुदत संपलेली औषधे विकली. आजही कांदा बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. बाळासाहेब हराळ बाजार समितीवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे,'' अशी टीका बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केली. 

हेही वाचा : अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत 80 कोटींचा गैरव्यवहार; प्रशासक नेमण्याची मागणी
ते म्हणाले, ""शेतकऱ्यांनी समितीचा कारभार आमच्या ताब्यात दिला आहे. विरोधकांना बाजार समितीची सत्ता मिळत नसल्याने आता त्यांनी बाजार समितीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. जिल्हा परिषदेतून 15 वर्षांत प्रचंड माया गोळा केली. काही ठरावीक ठेकेदार मंडळींना हाताशी धरून टक्केवारी गोळा करण्याचा आपला धंदा सर्वांना माहीत आहे. बाजार समितीमधील बी-बियाण्याच्या दुकानातून मुदत संपलेली औषधे विकून शेतकऱ्यांची फसवणूक का केली? आजही कांदा बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत, शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे विकून शेतकऱ्यांची लूट करण्याचे काम सुरू आहे.

याचे उत्तरही त्यांनी द्यावे. बाजार समितीतील गाळे व जागा फक्त करारपद्धतीने भाडेतत्त्वावर दिल्या जातात. त्यामुळे जागा व गाळे हडप करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. बाजार समितीची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांचे उद्योग सुरू आहेत.''  या वेळी सभापती उपसभापती संतोष म्हस्के, संचालक विलास शिंदे, दिलीप भालसिंग यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harle allegations against the market committee are baseless