तुम्ही कधी निळा भात खाल्लाय? आपल्या अकोल्यात पिकतोय, मधुमेह, कॅन्सरसारख्या आजारांवर आहे गुणकारी !

शांताराम काळे
Monday, 7 September 2020

निळ्या भाताची वैशिष्ट्ये हे इन्डोनेशिआ व आसामच्या पूर्वापार व्यापार संबंधातून ते आले. ते सटायव्हा जातीच्या इंडिका उपजातीत मोडते. त्याची साळ काळी, जांभळी तर तांदूळ गर्द जांभळे (काळे) व लांबट आहेत. शिजवल्यावर भातही जांभळा होतो. त्याचे औषधी गुणधर्म आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात त्याला मागणी आहे.

अकोले : देशातील बहुतांशी घरात भात असतोच असतो. तांदळाचे अनेकानेक प्रकार आहेत. चिन्नोर, बासमती, कोलम, उकडा, मदर इंडिया अशी काही नावं सांगता येतील. अकोल्यासारख्या डोंगराळ भागात काळी साळ म्हणजे काळा भात आढळतो. मात्र, आतून हे सगळे पांढरे होतात.फार तर ब्राउन राईस असतो. परंतु महाराष्ट्रात आता निळा तांदूळ आला आहे.

हा भात नेमका कोठून कसा आला. तो आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. हा निळा भात आपल्या देशातही नवीच आहे. आसाम राज्यातून तो महाराष्ट्रात म्हणजे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आला आहे.

हेही वाचा - हा आहे बटाट्याचा रंजक इतिहास

पूर्वी आत्मामध्ये या कृषी विभागातील कार्यरत असलेले डॉ. रावसाहेब बेंद्रे हे आसाम राज्य कृषी विभागात सल्लागार आहेत. त्यांनी ही नवीन जात महाराष्ट्रात आणली.  विशेषतः अकोले तालुक्यातील आदिवासी भागात उपक्रमशील शेतकरी विकास आरोटे यांच्या शेतात तिचा प्रयोग केला.

या तांदूळास आसामी ब्लॅक म्हणून ओळखले जाते. सध्या त्याचे उत्पादन ९ एकरांत घेतले आहे. तालुक्याच्या आदिवासी भागात सध्या सेंद्रिय शेतीने जोर धरला आहे.

या दुर्धर आजारावर उपाय

जगभरात सर्वात महागडा औषधी तांदूळ म्हणून मूळ इन्डोनेशिआचा (आसामी ब्लॅक ) तांदूळ आता अकोलेत पिकला आहे. तीन किलो बियाण्यापासून यंदा थेट दहा एकरावर याची लागवड झाली. हे पीकही जोमदार आहे. शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. डायबिटीस, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर हा तांदूळ फायदेशीर ठरतो.

हनुमान शेतकरी गटाच्या, शांताराम बारामते व प्रयोगशील शेतकरी विकास देवराम आरोटे यांनी या आसामी ब्लॅक जातीचा वान विकसित केला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिली आहे. अकोले तालुक्यातील मेहंदुरीतील मेकॅनिकल इंजिनियरींग केलेले विकास आरोटे यांनी तालुक्यातील दोनशे शेतकर्यांचा गट बनवून समुह शेतीला सुरवात केली.

बियाणे ते बाजार ही यंत्रणा उभी केली. तालुक्यात 'कोलकत्ता ' या झेंडुच्या रोपांच्या निवडीसाठी ते कृषी विभागाच्या आत्माच्या टीमसोबत कलकत्ता येथे गेले होते, ग्रामीण भागात निळा आणि काळा असे दोन भाताचे एकाच जातीचे प्रकार आढळले. तेथून त्यांनी तीन किलो या निळ्या भाताचे बियाणे आणले. गतवर्षी ते मेहंदुरीत पाच गुंठे क्षेत्रात लावले. त्यापासून दोनशे किलो बियाणे तयार झाले.

तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी, बाळासाहेब बांबळे, अशोक धुमाळ तसेच आत्माचे बाळनाथ सोनवने यांनी हा भात तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर लावायचे ठरवले. यंदा धामणवन ,शिरपुंजे ,येथील वीस शेतकर्यांच्या शेतात हे निळा भात जोमदार आला आहे. मेंहंदूरीत आरोटे यांच्या शेतात वीस गुंठे क्षेत्रात ते ओंब्या येण्याच्या अवस्थेत आहे.

निळ्या भाताची वैशिष्ट्ये हे इन्डोनेशिआ व आसामच्या पूर्वापार व्यापार संबंधातून ते आले. ते सटायव्हा जातीच्या इंडिका उपजातीत मोडते. त्याची साळ काळी, जांभळी तर तांदूळ गर्द जांभळे (काळे) व लांबट आहेत. शिजवल्यावर भातही जांभळा होतो. महाराष्ट्रातील काळभाताची टरफल काळे तर तांदूळ पांढरे असतात. सध्या बाजारात या निळ्या भाताची ऑनलाईन खरेदीतीनशे ते पाचशे रूपये दराने विक्री होते.

भारतात आसाम, मणिपूर, पंजाब, राज्यात याचे निर्यातक्षम पीक होते. महाराष्ट्रात ते पहिल्यांदाच पिकवले असल्याचा अंदाज आहे. ब्ल्यू (ब्लॅक) राईसचे गुणधर्म औषधी आहेत. जगात तांदळाच्या तीस हजार तर भारतात सहा हजार जाती अढळतात. डायबिटीसला हे गुणकारी औषध आहे.

ही इन्डोनेशिआची पारंपारिक जात असल्याने अकोले, आसामात समान वातावरणात ती वाढते. त्यात फायबर, लोह,ताम्र तसेच अॅन्टीऑक्सीटंटचे प्रमाण अधिक असल्याने कॅन्सररोधक व शरीर साफ करणारे म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. सध्या भारतात ते आसामी काळभात म्हणून प्रसिद्ध आहे. पंचतारांकित हॉटेलात याला मोठी मागणी असते. 

 

पिकाची उंची जास्त व दणकट बुंधा असल्याने ते वाऱ्याने पडत नाही. चारा दुप्पट निघतो. एकरी वीस ते पंचवीस पोते साळ निघते. " मी गतवर्षी आसामच्या शेतकऱ्याकडून तीन किलो बियाणे घेतले. पाच गुंठे क्षेत्रात दोनशे दहा किलो बियाणे तयार केले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यात प्रयोगासाठी शंभर रूपये किलोने बियाणे घेतले. हा प्रयोग यशस्वी होतोय, याचा खुप मोठा आनंद आहे "

- विकास आरोटे, मेहंदुरी ,शेतकरी.

 

राज्यातील पहिलाच प्रयोग

" तालुक्यातील राजुर ते घाटघर व मुळा काठावरचे हवामान आसामशी जुळते निळ्या (आसामी ब्लॅक) सध्या धामणाव व शिरपुंजे येथे दहा एकरावर वीस शेतकऱ्यांच्या शेतात ओंब्या येण्याच्या अवस्थेत आहे. या प्रयोगांतून अकोले तालुक्याला राज्यात वेगळी ओळख मिळेल. कदाचित हा राज्यातील पहीला प्रयोग असेल."

- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Have you ever eaten blue rice