पडल्या आरदडा भरल्या गरदडा... पाच मंडलात अतिवृष्टी, सीनामाई झाली वाहती 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

पाच महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. नायगाव, सलाबतपूर, कुकाणे, एरंडगाव, निघोज, धांदरफळ, दहिगाव बोलका या सात महसूल मंडलांचे खाते मात्र निरंक राहिले.

नगर ः प्रत्येक नक्षत्राबाबत शेतकर्यांचे एक विश्लेषण किंवा निरीक्षण असते. आर्द्रा नक्षत्राबाबत ग्रामीण भागात एक म्हण अाहे. पडतील आरदडा तर भरतील गरदडा. म्हणजे अार्द्रा नक्षत्रात पाऊस झाल्यास सर्व खड्डे जलमय होतील. काल जिल्ह्यात तसंच झालं. आणि सीनामाई वाहती झाली. पाच मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.

जिल्ह्यात काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल (गुरुवार) रात्री आर्द्रा नक्षत्रात 97 पैकी 90 मंडलांत सर्वदूर हजेरी लावली. त्यात भिंगार, नागापूर, चिचोंडी पाटील, अकोले व काष्टी मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या शेतशिवारात खरीप पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

हेही वाचा - इंदोरीकर महाराजांवर अखेर गुन्हा दाखल

पावसाने 10 जूनपासून सुरवात केली. मृग नक्षत्राच्या जोरदार हजेरीमुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीने वेग घेतला. आजअखेर जिल्ह्यात तब्बल सव्वातीन लाख हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. त्यानंतर 21 जूनला आर्द्रा नक्षत्र सुरू झाले. त्यातही पहिले चार दिवस पावसाने दडी मारल्याने शिवारात चिंतेचे मळभ दाटून आले होते. मात्र, 24 तारखेपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला. काल (गुरुवारी) जिल्ह्यातील 90 महसूल मंडलांमध्ये पावसाने हजेरी लावली.

या पैकी पाच महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. नायगाव, सलाबतपूर, कुकाणे, एरंडगाव, निघोज, धांदरफळ, दहिगाव बोलका या सात महसूल मंडलांचे खाते मात्र निरंक राहिले. जिल्ह्यात सरासरी 515.23 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जून महिन्यातच 199.24 मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत झालेला पाऊस 38.67 टक्के आहे. सलग तीनही नक्षत्रांतील पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडल्याने खरीप हंगामाची आशा बळावली आहे. 

  • मुसळधार 
  • काष्टी-71 
  • भिंगार-89 
  • नागापूर-84 
  • चिचोंडी पाटील-76 
  • अकोले-66 
  • (मिलिमीटर) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rainfall in five circles