सोनईतील हिंदू लढले मुस्लिम उमेदवारासाठी, विजयानंतर सय्यद यांचे छत्रपतींना अभिवादन

विनायक दरंदले
Monday, 18 January 2021

सोनई ग्रामपंचायतीची स्थापना सन १९६० साली झाली. तेंव्हापासून सदस्य मंडळात मुस्लिम समाजास प्रतिनिधित्व मिळाले नव्हते.

सोनई (जि.अहमदनगर): सोनई ग्रामपंचायतीच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम समाजास प्रतिनिधित्व मिळाले. या आनंदात युवा मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून आनंद व्यक्त केला. नगर जिल्ह्यात त्यांच्या या शिवभक्तीची चर्चा सुरू आहे.

सोनई ग्रामपंचायतीची स्थापना सन १९६० साली झाली. तेंव्हापासून सदस्य मंडळात मुस्लिम समाजास प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी या निवडणुकीत इम्तेसाम जमशेद सय्यद (वय-२०) या युवतीस प्रभाग चारमधून संधी दिली. प्रभागातील सर्व धर्मिय कार्यकर्त्यांनी कष्ट घेत सय्यद यांचा विजय सुकर केला.

विजयानंतर इम्तेसामचे वडील जमशेद सय्यद यांनी सर्वप्रथम शिवाजी चौकात येवून छत्रपती पुतळ्यास पुष्पहार घालून आशीर्वाद घेतला. यावेळी फारुक पठाण, इसाक शेख,नजीर शेख, फिरोज पठाणसह शंभरहून अधिक युवक उपस्थित होते. मंत्री गडाख सर्व समाजाला बरोबर घेवून जात असून त्यांचे कार्य भुषणावह आहे. असे सय्यद यांनी सांगितले. 

हेही वाचा - मिरजगाव ग्रामपंयातीत महाविकास आघाडी-भाजपचा टाय
 

सामाजिक कामात असतो पुढाकार

सामाजिक कार्यकर्ते नवनिर्वाचित सय्यद यांच्या पुढाकारातून रमजान ईद, शिवजयंती, गणेशोत्सव हे सण गुणगोविंदाने साजरे केले जातात. सोनई मुस्लिम समाजाची सुमारे एक हजार मते आहेत. मात्र, वेगवेगळ्या वॉर्डात विखुरली आहेत. या समाजाला ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत संधी नव्हती. त्यामुळे मंत्री गडाख यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या पॅनलकडून सय्यद यांना संधी दिली.

सय्यद यांना २०० मतांचे लिड

सय्यद यांच्या विरोधात प्रकाश शेटे पॅनलचे श्यामला येळवंडे रिंगणात होत्या. इतर प्रभागातील काही लोकांनी हिंदू-मुस्लिम असा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या प्रभागातील मतदारांनी तो विषय झुगारून सय्यद यांना विजयी केले. विशेष म्हणजे तेथे हिंदू मतदार जास्त आहेत. सुमारे दोनशे मतांच्या फरकाने ते विजयी झाले. या गावात विशेष म्हणजे मुस्लिम समाजाची प्रार्थना स्थळे शिवाजी चौकात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindus in Sonai fought for Muslim candidate