बायको यडी झालीय मी नाही घरात घेणार, ती मात्र लेकरांसाठी फोडतेय हंबरडा

शांताराम काळे
Tuesday, 1 September 2020

गावकऱ्यांनी तिला शोधून दिले. परंतु तो स्वतःहून तिला घरी नेण्यासाठी तयार नाही. तुम्ही तिला तिकडेच ठेवा नाही तर दवाखाना दाखवा असे म्हणत हात झटकले. त्या महिलेची बहीण राजूर मध्येच राहत असल्याचे पुढे आले आहे .नातेवाईक तिचा शोध घेत नाही.

अकोले : विठा गावातील मंदिरातून तिला वृद्धाश्रमात नेण्यात आले. पण तिथे प्रवेश न मिळाल्याने तिची परवड पुन्हा सुरू झाली. ती चालत रस्त्यावर आली नि भरपावसात एकाच जागी उभी राहून  पुन्हा माझी मुले द्या म्हणत अंगावर ओलेचिंब कपडे हातात बोचके घेऊन ही महिला राजूरपासून एक किलोमीटर असलेल्या गांजवणे रस्त्यावर उभी आहे.

त्याचे असे झाले ः विठा गावात फिरत फिरत ही महिला विठ्ठल मंदिरात पोहचली. मंदिराच्या दारात बसून ती आपल्या मुलांचा जप करीत आहे. माझी मुले द्या म्हणत  गेल्या १५ दिवसांपासून ती मंदिरात आहे. ग्रामस्थांनी तिला जेवण दिले. नंतर तिला आश्रमात नेण्यासाठी फोनाफोनी झाली.

आश्रमाच्या संचालकांनी कोविडची टेस्ट करण्याचा सल्ला दिला. मात्र, तिचा अवतार पाहून स्थानिक डॉक्टर व ग्रामस्थ तिची टेस्ट करण्यास धजावले नाही. मग तिला एका टेम्पोत बसवून वृद्धाश्रम येथे नेऊ म्हणून काही व्यक्तीने तिला राजुरला आणले. महिला पुन्हा रस्त्यावर आली.

माझी मुले द्या म्हणत रस्त्यावर एकच ठिकाणी भर पावसात उभी आहे. जाणारे-येणारे मात्र बघ्याची भूमिका घेऊन पुढे सरकतात. काहीजणांना तिची दया आली. त्यांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर तिची ओळख पटली.

तिच्या गावाचाही पत्ता गवसला. तिला दोन मुले आहेत. एक आठवीत शिकतो तर दुसरा पाचवीत आहे. तिला वेड लागल्याने ती आहे त्या कपड्यानिशी घरातून बाहेर पडली. ती परत  घरी आली नाही असे तिच्या पतीचे म्हणणे आहे.

गावकऱ्यांनी तिला शोधून दिले. परंतु तो स्वतःहून तिला घरी नेण्यासाठी तयार नाही. तुम्ही तिला तिकडेच ठेवा नाही तर दवाखाना दाखवा असे म्हणत हात झटकले. त्या महिलेची बहीण राजूर मध्येच राहत असल्याचे पुढे आले आहे .नातेवाईक तिचा शोध घेत नाही. राजूर तालुका प्रेस क्लबने पुढाकार घेऊन याबाबत राजूर पोलिसांना संपर्क केला. पोलीस अधिकारी नितीन पाटील त्या महिलेला योग्य ठिकाणी पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: His wife went crazy and kicked him out of the house