esakal | सोलापूरची ‘ती’ सभा ठरली शरद पवार यांची ‘पॉवर’!
sakal

बोलून बातमी शोधा

Historic public meeting held in September 2019 in Solapur

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडून अनेक नेते जात होते.

सोलापूरची ‘ती’ सभा ठरली शरद पवार यांची ‘पॉवर’!

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडून अनेक नेते जात होते. मात्र, त्यानंतरही सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे चित्र सोलापुरात सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या सभेत दिसले होते. तेव्हा वेगवेगळी कारणे सांगत पक्ष संकटात असताना करमाळ्यातील बागल, बार्शीचे सोपल, माळशिरसचे मोहिते- पाटील यांनी पंक्षांतर केले होते. 

माढ्याची शिंदे व सांगोल्याचे साळुंखे हेही पक्षांतर करण्याची तयारी असल्याची तेव्हा चर्चा होती. जे भाजप व शिवसेनेत गेले त्यांच्याबरोबर सामान्य कार्यकर्ता गेला नाही हे या सभेवेळी झालेल्या गर्दीने दाखवून दिले होते. हुतात्मा स्मृतीमंदिर येथे झालेल्या या सभेत तरुण, शेतकरी, कामगार यांनी प्रचंड गर्दी केली होती. सभागृहाबाहेर देखील उभा राहिला जागा नव्हती. त्या सभेवरुन नेत्यांच्या शिवसेना व भाजप प्रवेशावेळी एकतर्फी वाटणारी निवडणूक सोपी नाही याची चुणूक दिसून आली होती. आणि तसं वातावरण फिरत गेले.

हेही वाचा : एकही नेता बरोबर नसताना पवारांनी दाखवली ‘पॉवर’!
लोकसभा निवडणुक झाल्यानंतरची आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरची ही शरद पवार यांची पहिली सभा होती. नेहमीचे नेते नसतानासुद्धा शरद पवारांच्या सभेला झालेल्या गर्दीने विरोधकांचाही भुवया उंचावल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शरद पवार सोलापुरात पहिल्यांदा आले होते.

विधानसभेच्या तोंडावर पक्षांतर झाल्याने राज्यभर निघालेली ‘शिवस्वराज्य यात्रा’ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि माढा येथे घेता आली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीला नामुष्की पत्करावी लागली होती. त्यामुळे कार्यकर्तेही हवालदिल झाले होते. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीने उमेदवारी मिळणार नाही, असे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन विश्वास देण्याचे काम केले आहे. 

या मेळाव्यात गर्दीमुळे सभागृहात कार्यकर्त्यांना जागा मिळत नव्हती. त्यामुळे बाहेर थांबावे लागले होते. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी ‘सोलापूर आणि शरद पवार’ यांचे असलेले नाते सांगून शेतकरी, कामगार, तरुण व वृद्ध कार्यकर्त्यांना लढण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी किल्लारी येथे झालेल्या भूकंपाच्या वेळी राज्याचा प्रमुख म्हणून केलेली मदत व भाजप सरकारने कोल्हापूर, सांगली येथील पुरावेळी केलेली मदत याचे दाखले दिले होते. 

यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक आठवणी सांगितल्या होत्या. या मेळाव्यातील गर्दीचा राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी कितपत उपयोग होईल हे तेव्हा सांगता येत नव्हते. मात्र त्या गर्दीचे रुपांतर झालेल्या निवडणुकीत झाले. तेव्हा झालेल्या सभेत गेले ते कावळे राहिले ते मावळे म्हणत पक्षांतर करणाऱ्यांना फटकारले होते.