
Puran Poli : महाग झाली होळीची पुरणपोळी!
नागपूर : पुरणपोळी आणि होळी यांचे अतुट नाते! त्यामुळेच या सणाला पुरणपोळ्यांना विशेष मागणी असते. होळीला पुरणपोळीच्या नैवेद्यांनी सजवण्याची परंपरा आहे. यंदा पुरणपोळी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिन्नसांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने पुरणपोळी महाग झाली आहे. त्यामुळे यंदाच्या होळीला महागाईचा रंग चढला आहे.
सणावारांच्या तोंडावर मागणी वाढल्याने हरभरा डाळींच्या दरात वाढ झाली आहे. महिन्याचा अखेर असल्याने गेल्या आठवड्यात बाजारात ग्राहकांची वर्दळ मंदावलेली होती. महिन्याच्या सुरवातीला होळी आहे. त्यामुळे बाजारात वर्दळ वाढू लागली आहे. होळी आणि पुरण पोळी हे समीकरण घट्ट आहे. परंतु, यंदा हरभरा डाळीचे भाव प्रति किलो आठ ते दहा रुपयांनी वाढल्याने पुरण पोळी खवय्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.
नवीन हरभऱ्याची आवक होण्यासाठी अजून वेळ आहे. होळीच्यानिमित्ताने हरभरा डाळीची मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत. घाऊक बाजारात हरभरा डाळीच्या दरात क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांनी, तर किरकोळ बाजारातही प्रतिकिलोमागे आठ ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. ही तात्पुरती वाढ असून नवीन हरभरा डाळ बाजारात येताच भाव कमी होतील. चन्याचे यंदा चांगले उत्पादन झालेले आहे. त्यामुळे यंदा हरभरा डाळीच्या दरात वाढ होण्याचे संकेत कमी आहेत, असे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
होळीनिमित्त गृहिणी घरी पुरणपोळी तयार करीत असल्या तरी घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला रेडिमेड पुरणपोळीला पसंती देतात. पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारी चणाडाळ, साखर, घरगुती गॅस आदींच्या किमती वाढल्याने रेडिमेड पुराणपोळ्या महागल्या आहेत. शहरात लहान पुरणपोळ्या प्रतिनग २० ते २५; तर मोठ्या पुरणपोळ्या ४० रुपयांपर्यंत विकल्या जात आहे.
- कांचन अंतापूरकर, संचालक सर्वेश गृह उद्योग